ऍडलेडमधील ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तातडीने न्यू साऊथ वेल्सला हलवले
सिडनी / वृत्तसंस्था
भारताविरुद्धची मालिका वाचवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. ऍडलेडमध्ये कोरोनाचा उद्रेक उसळल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी कर्णधार टीम पेन व स्टार फलंदाज मार्नस लाबुशाने यांच्यासह काही खेळाडूंना ऍडलेडमधून हवाईमार्गे न्यू साऊथ वेल्स प्रांतात नेले. पश्चिम ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलँड व टास्मानिया यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी आपले मार्ग बंद केले असून या देशाच्या क्रिकेट मंडळाने मालिका सुरक्षित राखण्यासाठी खेळाडूंना सिडनीत आणणे पसंत केले.
‘खेळाडूंना तातडीने प्रवास करणे भाग पाडल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण, पूर्ण हंगाम सुरक्षित वातावरणात संपन्न व्हावा, यासाठी हे आवश्यक होते’, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम व्यवस्थापकीय अधिकारी निक हॉकली यांनी नमूद केले. पेन, लाबुशाने यांच्यासह मॅथ्यू वेड, ट्रव्हिस हेड व कॅमेरुन ग्रीन यांनाही यावेळी सिडनीत आणले गेले. ऑस्ट्रेलियात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करत आहे. पण, यानंतरही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उभय संघातील कसोटी मालिका पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होईल, असा दावा केला आहे. दोन्ही संघ ऍडलेडमध्ये दि. 17 डिसेंबरपासून पहिली कसोटी खेळणार आहेत.
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया दक्षिण ऑस्ट्रेलियातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असेल आणि तेथील परिस्थिती कशी असेल, त्यावरुन प्रांतनिहाय सीमारेषा खुल्या करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. हंगामातील सर्व क्रिकेट प्रकारातील सामने निर्धोकपणे संपन्न होतील, यावरच आमचे लक्ष केंद्रित असणार आहे’, असे ते पुढे म्हणाले. सोमवारपासून ऑस्ट्रेलियातील विविध प्रांतात कोरोनाने अतिशय गंभीर स्वरुप धारण केले असून ऍडलेडमधून येणाऱया प्रत्येक व्यक्तीसाठी 14 दिवसांचे हॉटेल क्वारन्टाईन सक्तीचे केले आहे.
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱयावर असून पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, त्यात 3 वनडे, 3 टी-20 व 4 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. दि. 27 नोव्हेंबरपासून सिडनीतील पहिल्या वनडे सामन्याच्या माध्यमातून मालिकेला प्रारंभ होईल तर कसोटी मालिकेचा दि. 17 डिसेंबरपासून दिवस-रात्र लढतीने बिगुल वाजणार आहे. भारतीय संघ सध्या सिडनीतच क्वारन्टाईन आहे.
पहिल्या कसोटीत संधी मिळेल : पुकोवस्कीला खात्री
ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख, गुणवान फलंदाज विल पुकोवस्कीने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत निश्चितपणाने संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. भारताविरुद्ध मालिकेसाठी निवडल्या गेलेल्या 17 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघात वर्णी लागलेल्या पुकोवस्कीने शेफिल्ड शील्ड या ऑस्ट्रेलियातील प्रथमश्रेणी स्पर्धेत लागोपाठ दोन द्विशतके झळकावण्याचा पराक्रम साधला आहे.
या स्थानिक स्पर्धेतील पहिल्या दोन फेरीत खेळण्याची संधी मिळाली नाही. तरीही उर्वरित मालिकेतील 3 डावातच त्याने 495 धावांची जोरदार आतषबाजी केली. सध्या तो मालिकेतील सर्वोच्च धावा जमवणारा अव्वल फलंदाजही आहे. 22 वर्षीय पुकोस्कीला यापूर्वी लंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले होते. पण, मानसिक आजारपणामुळे त्याने त्या मालिकेतून ऐनवेळी माघार घेतली होती.
पुकोवस्कीला अनपेक्षित संधी मिळाल्यानंतर जो बर्न्सला डच्चू मिळेल, असे चित्र निर्माण झाले. स्वतः जो बर्न्स खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला वगळत पुकोवस्कीला खेळवले जाईल, अशी शक्यता ठळक चर्चेत आली. पण, मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर व कर्णधार टीम पेन या दोघांनीही जो बर्न्सच्या अनुभवाला आपली पहिली पसंती असेल, हे निक्षून सांगितले आहे.
मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पॅट कमिन्सचा अद्याप निर्णय नाही
सिडनी : भारताविरुद्ध आगामी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत खेळायचे का, याचा आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सांगितले. आयपीएल स्पर्धेसाठी कमिन्स 3 महिने जैवसुरक्षित वातावरणात राहिला. त्यानंतर मागील आठवडय़ात तो संयुक्त अरब अमिरातीमधून मायदेशी परतला आहे.
‘मी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. तीन महिने जैवसुरक्षित वातावरणात राहणे आव्हानात्मक असते. पुढील रणनीतीबाबत लवकरच खुली चर्चा होणे अपेक्षित आहे’, असे 27 वर्षीय कमिन्स व्हीडिओ कॉन्फरन्सिंगवरुन म्हणाला. पॅट कमिन्सचा कसोटी व मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांमध्ये उपकर्णधार या नात्याने ऑस्ट्रेलियन संघात समावेश आहे. उभय संघातील मालिकेत मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने सिडनी व कॅनबेरात होणार आहेत. यातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी संघात समाविष्ट असलेल्या कमिन्ससह स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांना कसोटी सामन्याची तयारी करण्यासाठी जेमतेम एका आठवडय़ाचा कालावधी मिळणार आहे. पॅट कमिन्सने आतापर्यंत खेळलेल्या 30 कसोटी सामन्यात 143 बळी घेतले आहेत.
सध्या पॅट कमिन्स सिडनीत 14 दिवस क्वारन्टाईन असून दि. 27 नोव्हेंबर रोजी तो संघात दाखल होईल. याच दिवशी एससीजीवर पहिली वनडे खेळवली जाणार आहे.
डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ संघात परतले असल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत असेल. पण, 2018-19 कसोटी मालिका जिंकणे त्यावेळी देखील आव्हानात्मकच होते. कोणत्याही मालिकेत विजय सहजासहजी मिळवता येत नसतो.
-भारताचा मध्यफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा