वृत्तसंस्था/ मेलबर्न
रविवारी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱया सामन्यात अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने इंग्लंडचा 5 गडय़ांनी पराभव करत सध्या ऍशेस मालिकेमध्ये 10-4 अशी आघाडी मिळविली आहे. या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी खेळविला जाणार आहे.
रविवारी खेळविण्यात आलेल्या वनडे मालिकेतील दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 129 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 5 बाद 131 धावा जमवित हा सामना पाच गडय़ांनी जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरी आणि मॅकग्रा यांची अष्टपैलू कामगिरी महत्त्वाची ठरली. इंग्लंडच्या डावामध्ये इक्लेस्टोनने 32 तर ऍमी जोन्सने 28 धावा जमविल्या. हिलने 24 तर नाईटने 18 धावा जमविल्या. इंग्लंडच्या केवळ चार फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. ऑस्ट्रेलियातर्फे मॅकग्राने 4 धावांत 3 तर पेरीने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात पेरीने 40 तर गार्डनरने नाबाद 35 धावा झळकविल्या. इंग्लंडतर्फे क्रॉसने 46 धावांत 2 गडी बाद केले. संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 46 षटकांत सर्वबाद 129 (इक्लेस्टोन 32, ऍमी जोन्स 28, हिल 24, नाईट 18, मॅकग्रा 3-4, पेरी 3 बळी), ऑस्ट्रेलिया 5 बाद 131 (पेरी 40, गार्डनर नाबाद 35 क्रॉस 2-46).