वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय न्यूझीलंड संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली असून नवोदित वेगवान गोलंदाज काईल जेमीसन त्यात संधी देण्यात आली आहे तर काहीसा निष्प्रभ ठरलेल्या टिम साऊदीवर निवड समितीने विश्वास दाखविला आहे. 13 मार्चपासून ही मालिका सिडनीतील सामन्याने सुरू होणार आहे.
भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे व कसोटी मालिकेत जेमीसनने चमकदार प्रदर्शन करीत न्यूझीलंडच्या मालिकाविजयात मोलाची भूमिका बजावली होती. दुसऱया कसोटीत तर त्याने पाच बळीही मिळविले होते. ‘जेमीसनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला झोकात सुरुवात केली असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो आमच्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकतो,’ असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले. वनडेमध्ये बळी मिळविण्यासाठी साऊदीला अलीकडे झगडावे लागले आहे. पण कसोटीत त्याने शानदार प्रदर्शन केल्याचे लक्षात घेऊन त्याला संघात स्थान दिले आहे. बोल्ट, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन यांचे पुनरागमन झाल्याने संघाची गोलंदाजीची बाजू आणखी भक्कम झाली आहे. दुखापतीमुळे तिघेही भारताविरुद्ध वनडेत खेळू शकले नव्हते. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियात आतापर्यंतच्या 14 प्रयत्नात एकदाही वनडे मालिका जिंकलेली नाही. यावेळी यजमानांवर मात करण्यासाठी सर्व अनुभव पणाला लावण्याची गरज असल्याचे प्रशिक्षक स्टीड म्हणाले.
न्यूझीलंड संघ : विल्यम्सन (कर्णधार), ब्लंडेल, बोल्ट, डी ग्रँडहोम, फर्ग्युसन, गप्टिल, हेन्री, जेमीसन, लॅथम, नीशम, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, साऊदी, रॉस टेलर.