आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया-विंडीज यांच्यात आज (बुधवार दि. 30) पहिली उपांत्य लढत होत आहे. मात्र, या लढतीपूर्वी दोन्ही संघांना मोठे धक्के सोसावे लागले. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी पाठदुखीचा त्रास वाढल्याने खेळणार नाही, हे स्पष्ट झाले तर विंडीजची आघाडीची फिरकीपटू ऍफी फ्लेचर कोरोनाची बाधा झाल्याने या लढतीतून बाहेर फेकली गेली. भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहाटे 3.30 वाजता लढतीला प्रारंभ होत आहे. सहा वेळचे चॅम्पियन्स ऑस्ट्रेलिया यंदा अद्याप अपराजित असून हाच विजयी धडाका येथे विंडीजविरुद्धही कायम राखण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असणार आहे.
31 वर्षीय एलिस पेरीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साखळी सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान डाईव्ह मारल्यानंतर पाठीच्या वेदना जाणवल्या आणि ती फलंदाजीला देखील उतरु शकली नाही. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात देखील तिला सहभागी होता आले नाही.
‘एलिस पेरी तंदुरुस्ती चाचणी पार करु शकली नाही. त्यामुळे, आम्हाला उपांत्य लढतीत तिच्याशिवाय खेळावे लागेल’, असे ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग पत्रकार परिषदेत म्हणाली. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत आगेकूच केल्यास जेतेपदाच्या निर्णायक लढतीत एलिस पेरी उपलब्ध होऊ शकेल, अशी आमची अपेक्षा असल्याचे तिने येथे नमूद केले. एलिस पेरीला उपांत्य फेरीत खेळता न येण्याची ही सलग दुसरी वेळ असेल. यापूर्वी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने मायभूमीत टी-20 वर्ल्डकप जिंकला, त्यावेळी उपांत्य फेरी व अंतिम लढतीत पेरीला धोंडशिरेच्या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते.
विंडीजलाही धक्का
विंडीजची आघाडीची फिरकीपटू ऍफी फ्लेचर ही देखील आजच्या उपांत्य लढतीत खेळू शकणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. कोरोनाची बाधा झाल्याने फ्लेचर बाहेर फेकली गेली असून ‘ट्रव्हेलिंग रिझर्व्ह’ म्हणून संघासमवेत असणारी मँडी मँग्रू तिची जागा घेईल. ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी मजबूत असल्याने फ्लेचरच्या गैरहजेरीचा विंडीजच्या गेमप्लॅनला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऍफी फ्लेचरने आतापर्यंत विंडीजतर्फे 58 वनडे सामने खेळले आहेत. यंदा वनडे विश्वचषक स्पर्धेत तिने 3 सामन्यात 4 बळी घेतले आहेत.