ऑस्ट्रेलियाची विंडीजवर तर लंकेची स्कॉटलंडवर मात
वृत्तसंस्था/ जॉर्जटॉऊन (गयाना)
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटातील पुरूषांच्या आयसीसी युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ ऑस्ट्रेलिया, श्रीलंका यांनी विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात विंडीजचा तर लंकेने स्कॉटलंडचा पराभव केला.
विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा डाव 40.1 षटकांत 169 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 44.5 षटकांत 4 बाद 177 धावा जमवित हा सामना 10 गडय़ांनी जिंकला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भेदक आणि शिस्तबद्ध अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचा डाव केवळ 169 धावांत आटोपला. विंडीज संघातील ऑगेस्टीने 67 चेंडूत 57 धावा जमविल्या. रिव्हाल्डो क्लार्कने 29 धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱयासमोर विंडीजची स्थिती 6 षटकाअखेर 3 बाद 12 अशी केविलवाणी होती. ऑगेस्टी आणि रिव्हाल्डो क्लार्क यांनी चौथ्या गडय़ासाठी 95 धावांची भागिदारी केली. क्लार्कने 42 चेंडूत 37 धावा जमविल्या. क्लार्क बाद झाल्यानंतर विंडीजचा डाव पुन्हा गडगडला. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज राधाकृष्णनने क्लार्कला 22 व्या षटकांत बाद केले. राधाकृष्णनने विंडीजचे आणखी दोन फलंदाज बाद केल्याने विंडीजची स्थिती 32 व्या षटकांत 8 बाद 131 अशी झाली होती.
विंडीजच्या मॅकेनी क्लार्कने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 35 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 29 धावा जमविल्याने विंडीजला 169 धावापर्यंत मजल मारता आली. विंडीजचा डाव 40.1 षटकांत 169 धावांत समाप्त झाला. ऑस्ट्रेलियातर्फे व्हिटेनीने 20 धावांत 3 तर राधाकृष्णनने 48 धावांत 3 व कोनोलीने 17 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 44.5 षटकात 4 बाद 170 धावा जमवित या स्पर्धेत विजयी सलामी दिली. सलामीचा फलंदाज मिलर खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. विलीने कर्णधार कोनोलीसमवेत दुसऱया गडय़ासाठी 53 धावांची भागीदारी केली. कोनोलीने 23 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाचा हिगेन्स 9 धावांवर तंबूत परतला. कोनोली 18 व्या षटकांत बाद झाला. विलीने राधाकृष्णनसमवेत चौथ्या गडय़ासाठी 75 धावांची भागीदारी केली. राधाकृष्णनने 31 धावांचे योगदान दिले. त्यानंतर विली आणि केल्वे यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. केल्वेने 10 धावा जमविल्या. विलीने 129 चेंडूत 8 चौकारांसह 86 धावा झोडपल्या. विंडीजतर्फे जोनाथन लीनेने 19 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 40.1 षटकात सर्वबाद 169 (ऑगेस्टी 57, मॅकने क्लार्क 29, व्हिटेनी 3-20, राधाकृष्णन 3-48, कोनोली 3-17) ऑस्ट्रेलिया 44.5 षटकात 4 बाद 170 (विली 86, राधाकृष्णन 31, कोनोली 23, लेनी 1-19).
लंकेची विजयी सलामी
या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात लंकेने स्कॉटलंडचा 40 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेचा डाव 45.2 षटकात 209 धावांत आटोपला. त्यानंतर स्कॉटलंडचा डाव 48.4 षटकांत 178 धावांत समाप्त झाल्याने लंकेने या स्पर्धेत विजयी सलामी दिली.
लंकेच्या डावात सेकुना लियानगेने 85 चेंडूत 85 धावा झळकविल्या. चमिंदू विक्रमसिंघेने 28, सदिशा राजपक्षेने 24 धावा केल्या. तळाचा फलंदाज रवीन डिसिल्वाने 50 चेंडूत 30 धावा केल्या. स्कॉटलंडतर्फे सीन फिशर केगॉने 56 धावांत 3 गडी बाद केले. जार्विस आणि डेव्हिडसन यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्कॉटलंडचा डाव 48.4 षटकांत 178 धावांत आटोपला. स्कॉटलंड संघातील जार्विसने 61 चेंडूत 55 धावा झळकविल्या. लंकेतर्फे दुनिथ वेलालगेने 27 धावांत 5 तर एस डॅनियलने 16 धावांत 2 गडी बाद केले. स्पर्धेतील पहिल्या दिवशी ड गटातील हे दोन सामने खेळविले गेले.
संक्षिप्त धावफलक
लंका 45.2 षटकात सर्वबाद 209 (सेकुना लियानगे 79, सी.विक्रमसिंघे 28,राजपक्षे 24, आर. डिसिल्वा 30, एस किगॉ 3-56), स्कॉटलंड 48.4 षटकांत सर्वबाद 178 (जार्वीस 55, डी.विलालगे 5-27, एस. डॅनियल 2-16).