सनसनाटी विजयासह ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत धडक, मॅथ्यू वेड-स्टोईनिसची अवघ्या 40 चेंडूत 81 धावांची अभेद्य भागीदारी निर्णायक, रविवारी जेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आमनेसामने
वृत्तसंस्था / दुबई
मॅथ्यू वेडच्या अवघ्या 17 चेंडूतील नाबाद 41 धावांच्या झंझावातामुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध सनसनाटी विजय संपादन करत आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. विजयासाठी 177 धावांचे कडवे आव्हान असताना मॅथ्यू वेडने 17 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 41 तर मार्कस स्टोईनिसने 31 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 40 धावा फटकावत अशक्यप्राय विजय सहजपणे खेचून आणला. 19 षटकात 5 बाद 177 धावांसह ऑस्ट्रेलियाने विजयश्रीवर आपली मोहोर उमटवली.
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 30 चेंडूत 62 धावांची गरज असताना पाकिस्तानची स्पर्धेतील अपराजित घोडदौड येथेही कायम राहील, असेच जवळपास संकेत होते. पण, प्रत्यक्षात मॅथ्यू वेड व स्टोईनिस यांची 6 व्या गडय़ासाठी 81 धावांची भागीदारी पाकिस्तानला अक्षरशः सैरभैर करुन निघून गेली. आजवर एकही टी-20 विश्वचषक जिंकू न शकलेल्या ऑस्ट्रेलियाची आता रविवारी होणाऱया अंतिम लढतीत न्यूझीलंडविरुद्ध कसोटी लागेल.
विजयासाठी 177 धावांचे आव्हान असताना कर्णधार ऍरॉन फिंच पहिल्याच षटकात पायचीत होत तंबूत परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नर (30 चेंडूत 49), मिशेल मार्श (22 चेंडूत 28) यांनी 51 धावांची भागीदारी साकारली. शदाब खानने 26 धावात 4 बळी घेत सातत्याने ब्रेकथू मिळवून दिले. पण, मॅथ्यू वेड व स्टोईसिनची जोडी जमली आणि त्यांना रोखणे पाकिस्तानच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे सुस्पष्ट झाले.
रिझवानचे तिसरे अर्धशतक
तत्पूर्वी, मोहम्मद रिझवानने या स्पर्धेतील आपले तिसरे अर्धशतक झळकावल्यानंतर पाकिस्तानने 4 बाद 176 धावांपर्यंत मजल मारली. फखर झमनची 32 चेंडूतील जलद 55 धावांची आतषबाजी देखील तितकीच महत्त्वाची ठरली.
सलामीवीर रिझवान (52 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 67) व बाबर आझम (44 चेंडूत 39) यांनी 71 धावांची सलामी दिली. त्यानंतर झमनने नाबाद खेळीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानने शेवटच्या 5 षटकात 59 धावांची लयलूट केली.
पाकिस्तानसाठी या लढतीतील पॉवर प्ले स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला. त्यांनी या 6 षटकांमध्ये बिनबाद 47 धावा वसूल केल्या.
ऑस्ट्रेलियाने या लढतीत नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. वास्तविक, या लढतीपूर्वी फ्ल्यू झाल्याने रिझवान व शोएब मलिक खेळू शकणार का, याबद्दलही साशंकता होती. मात्र, नंतर ते दोघेही तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले गेले.
रिझवान प्रारंभी आपल्या नेहमीच्या बहरात नव्हता. पण, बाबर आझमने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला चढवण्यात अजिबात कसर सोडली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अपेक्षित असलेला स्विंग मिळाला नाही. याचाही पाकिस्तानच्या फलंदाजांनी लाभ घेतला होता.
पाकिस्तानी कर्णधार आझमने जोश हॅझलवूडच्या लेट आऊटस्विंगरवर कव्हर ड्राईव्हचा आकर्षक फटका लगावत फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने खेचलेले पाचही चौकार मुख्यत्वेकरुन डीप मिडविकेट आणि लाँगऑन रिजनमधील होते.
लेगस्पिनर ऍडम झाम्पाने बाबरला डीपमधील वॉर्नरकरवी झेलबाद केले, त्यावेळी पाकिस्तानने 10 षटकात 71 धावांची मजल गाठली होती. या डावात दोनवेळा जीवदान लाभलेल्या रिझवानची फलंदाजी नंतर बहरत गेली. हॅझलवूडच्या गोलंदाजीवर ट्रेडमार्क हाफ स्वीप फटक्यावरील हुकूमत अधोरेखित करत त्याने आपले उपद्रवमुल्य दाखवून
दिले.
ऑस्ट्रेलियाने 7 ते 11 व्या षटकादरम्यान अवघ्या 28 धावा दिल्या. पण, त्यानंतर रिझवानने फलंदाजीतील गियर चेंज करत चौफेर फटकेबाजीवर भर दिला.
झमनला सूर सापडला
या स्पर्धेत फारसा सूर न सापडलेल्या झमनने येथे उत्तम फटकेबाजी करत 32 चेंडूत 55 धावा चोपल्या. याच धावसंख्येवर तो नाबादही राहिला. झाम्पाने काटेकोर मारा केला असला तरी हॅझलवूडला एकाच षटकात 21 धावा मोजाव्या लागल्या. रिझवान बाद झाल्यानंतर झमनने पॉवर हिटिंग स्कील्सचा उत्तम दाखला दिला.
सिक्स हिटिंग मशिन असिफ अली मात्र आश्चर्यकारकरित्या अपयशी ठरला. कमिन्सने त्याला पहिल्याच चेंडूवर स्मिथकरवी झेलबाद केले. झाम्पाने 4 षटकात 22 धावात 1 बळी, असे किफायतशीर पृथक्करण नोंदवले तर हॅझलवूड (4 षटकात 49 धावा) सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
धावफलक
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान झे. स्मिथ, गो. स्टार्क 67 (52 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), बाबर आझम झे. वॉर्नर, गो. झाम्पा 39 (34 चेंडूत 5 चौकार), फखर झमन नाबाद 55 (32 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), असिफ अली झे. स्मिथ, गो. कमिन्स 0 (1 चेंडू), शोएब मलिक त्रि. गो. स्टार्क 1 (2 चेंडू), मोहम्मद हाफीझ नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 13. एकूण 20 षटकात 4 बाद 176.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-71 (आझम, 9.6), 2-143 (रिझवान, 17.2), 3-158 (असिफ, 18.1), 4-162 (शोएब मलिक, 19.2)
गोलंदाजी : मिशेल स्टार्क 4-0-38-2, जोश हॅझलवूड 4-0-49-0, ग्लेन मॅक्सवेल 3-0-20-0, पॅट कमिन्स 4-0-30-1, ऍडम झाम्पा 4-0-22-1, मिशेल मार्श 1-0-11-0.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. रिझवान, गो. शदाब 49 (30 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), ऍरॉन फिंच पायचीत गो. शाहिन आफ्रिदी 0 (1 चेंडू), मिशेल मार्श झे. असिफ अली, गो. शदाब 28 (22 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), स्टीव्ह स्मिथ झे. झमन, गो. शदाब 5 (6 चेंडूत 1 चौकार), ग्लेन मॅक्सवेल झे. रौफ, गो. शदाब 7 (10 चेंडू), मार्कस स्टोईनिस नाबाद 40 (31 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), मॅथ्यू वेड नाबाद 41 (17 चेंडूत 2 चौकार, 4 षटकार). अवांतर 7. एकूण 19 षटकात 5 बाद 177.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-1 (फिंच, 0.3), 2-52 (मार्श, 6.2), 3-77 (स्टीव्ह स्मिथ, 8.3), 4-89 (वॉर्नर, 10.1), 5-96 (ग्लेन मॅक्सवेल, 12.2).
गोलंदाजी : शाहिन आफ्रिदी 4-0-35-1, इमाद वासिम 3-0-25-0, हॅरिस रौफ 3-0-32-0, हसन अली 4-0-44-0, शदाब खान 4-0-26-4, मोहम्मद हाफीझ 1-0-13-0.