पुढील वर्षात पूर्ण मालिकेचे आयोजन
लाहोर / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाने पुढील वर्षी पाकिस्तान दौऱयावर येण्यास संमती दिली असून त्यांचा हा 24 वर्षांनंतरचा पहिलाच पाकिस्तान दौरा असेल. ऑस्ट्रेलियाचा संघ यापूर्वी 1998 मध्ये पाकिस्तानच्या भूमीत आला होता. आगामी दौऱयात उभय संघात कराची (3 ते 7 मार्च), रावळपिंडी (12 ते 16 मार्च) व लाहोर (21 ते 25 मार्च) येथे 3 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असतील.
या दौऱयात दि. 29 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत मर्यादित षटकांचे 4 सामने खेळवले जाणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सोमवारी या दौऱयाची घोषणा केली.
यापूर्वी, इंग्लंड व न्यूझीलंड यांनी आपले नियोजित दौरे सुरक्षिततेच्या कारणास्तव रद्द केल्याने पीसीबीसाठी हा जबरदस्त धक्का ठरला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने प्रतिकूल स्थितीतही पाकिस्तान दौऱयासाठी संमती दिल्याने पीसीबीसाठी तूर्तास हा दिलासा ठरला आहे.
यंदा सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानी भूमीत दाखल झाला होता. मात्र, सुरक्षिततेचा धोका जाणवल्याने अगदी एकही सामना न खेळता त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडने देखील टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी नियोजित पाकिस्तान दौरा सुरक्षिततेच्या कारणास्तवच रद्द केला. यामुळे, देशात अव्वल दर्जाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत आणण्याच्या पीसीबीच्या प्रयत्नांना जबरदस्त धक्का बसला होता.
न्यूझीलंड व इंग्लंड यांच्याकडून सुरक्षिततेविषयी जाहीरपणे चिंता व्यक्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभण्याची शक्यता अंधुक होती. पण, ऑस्ट्रेलियाने अचानक या दौऱयावर येण्याचे मान्य केले आणि पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला.
‘जागतिक स्तरावर ऑस्ट्रेलियाचा संघ अर्थातच अव्वल दर्जाचा आहे आणि त्यांच्याविरुद्ध मायभूमीत खेळण्याची संधी मिळणे स्वागतार्ह असेल. अगदी पाकिस्तानी चाहत्यांसाठी देखील ही मालिका पर्वणी असणार आहे’, असे पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा म्हणाले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी निक हॉकली यांनी पीसीबीकडून सुरक्षिततेच्या आघाडीवर सर्व सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियन पथक पाक दौऱयावर
ऑस्ट्रेलियन संघाच्या या नियोजित दौऱयापूर्वी ऑस्ट्रेलियन सुरक्षातज्ञांचे पथक पाकिस्तानमध्ये येईल आणि टीम ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, सुरक्षाव्यवस्था व कोव्हिड-19 प्रोटोकॉल्सबद्दल रुपरेषा निश्चित करेल, याचा हॉकली यांनी येथे उल्लेख केला.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1998-99 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला, त्यावेळी मार्क टेलरच्या नेतृत्वाखाली 1-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती. 1959-60 नंतर त्यांचा हा पहिला मालिकाविजय ठरला होता. 1959-60 मध्ये रिची बेनॉ यांच्या ऑस्ट्रेलियन संघाने फझल महमूदच्या संघाचा 2-0 अशा फरकाने पराभव केला होता.