धामणे : धामणे येथील ओंकारेश्वर मल्टिपर्पज सौहार्द सोसायटीची सर्वसाधारण 7 वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. सोसायटीचे चेअरमन किरण चतूर, सभेला उपस्थित प्रमुख पाहुणे हभप शंकर बाळेकुंद्री, हभप सद्याप्पा सायनेकर, नारायण रेमाणाचे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सरस्वती आणि लक्ष्मी फोटो पूजन सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. सभेला उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन व्हाईस चेअरमन रियाज कोडलवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेक्रेटरी आशा बाळेकुंद्री यांनी अहवाल वाचन केले.
याप्रसंगी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन किरण चतूर म्हणाले, संस्थेकडे भागभांडवल 13,74,200 रु. मार्च अखेर आहे. मार्च 2019 मध्ये संस्थेत एकूण ठेवी 93,16,971 रु. इतक्या होत्या, 2,74,118 रुपयाने वाढ होऊन 2020 अखेर 1 कोटी 20 लाख 57 हजार 989 इतक्या ठेवी आहेत. चालू वर्षी 1,39,27,446 रुपये इतके खेळते भांडवल आहे. यावर्षी संस्थेची आर्थिक उलाढाल 5 कोटी रुपये इतकी झाली आहे. संस्थेने सामाजिक बांधिलकीचा उद्देश समोर ठेऊन व्यवसायाची प्रगती व्हावी म्हणून 2020 अखेर 1,22,80,115 रुपये इतके कर्ज दिले आहे. संस्थेकडून सभासदांना 5 टक्के लाभांश देण्याची तरतूद केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावर्षी संस्थेला 1,51,578 रुपये इतका निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगून, येत्या वर्षात संस्थेच्यावतीने नवीन योजना आखलेल्या असल्याचे सांगून सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा, असे जाहीर केले. सभेला संचालक अजित बाळेकुंद्री, भरमा चतूर, महेश बाळेकुंद्री, दीपक वाजंत्री, सीमा कदम व इतर संचालक उपस्थित होते.