प्रतिनिधी/ रत्नागिरी
जयगड येथे आलेल्या ओएनजीसीच्या जहाजावरील पाचपैकी चार जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले असून यातील तिघे जण उत्तर प्रदेशमधील रहीवासी आहेत. या जहाजावरील तिघांना गणपतीपुळेत तर एकाला जयगडमधील हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा गावात मुक्त वावर झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, या चौघांसह एकूण 11 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले असून बाधीतांची एकूण संख्या 476 झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यातील कर्टेल येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.
‘प्रिया’ नामक ओएनजीसीचे हे जहाज 17 जून रोजी मुंबई येथून जयगड येथे दाखल झाले होत़े. बुधवारी सकाळी खबरदारी म्हणून जहाजावरील कर्मचाऱयांच्या स्वॅबचे नमुने घेवून कर्मचाऱयांचे एका हॉटेलमध्ये अलगीकरणात करण्यात आले होते. यातील चौघांचे अहवाल शुक्रवारी रात्री पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यातील तिघे जण उत्तर प्रदेशमधील आहेत.
या कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱयांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े संपर्कात आलेल्या अन्य कर्मचारी व येथील बंदरावर काम करणाऱया कर्मचाऱयांची तपासणी तसेच इतर इतिहास शोधण्यात येत आहे. गणपतीपुळेमधील हॉटेलच्या 10 कर्मचाऱयांनाही क्वारांटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, हे चौघे क्वारंटाईन असतानाही गणपतीपुळे परिसरात फिरताना आढळले होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.
11 नवे रूग्ण, 3 मुक्त
शुक्रवार सायंकाळपासूनच्या 24 तासांत जिल्हय़ात 11 नवे रूग्ण सापडल्याने बाधीतांची एकूण संख्या 476 झाली आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील 4, उत्तर प्रदेशमधील 3, विधानगर कराड येथील 1 व खेड तालुक्यीतल कर्टेल येथील एकाचा समावेश आहे. तर रत्नागिरीतील 2 व लांजातील एक रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 349 झाली असून हे प्रमाण 73 टक्के आहे. आतापर्यंत 17 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून जिल्हयात सध्या 111 जण उपचाराखाली आहेत.
कर्टेलमधील एकाच कुटुंबातील तिघांना कोरोना
खेड : तीन दिवसांपूर्वी कोरोना अहवाल पाझीटीव्ह आलेल्या कर्टेल-चव्हाणवाडीतील 45 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये 38 वर्षीय महिला 5 वर्षीय बालिका व 15 वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. कर्टेल परिसरात कन्टेनमेंट झोन जाहीर केला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 66 वर पोहचली आहे.