सिडनी
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर आणि फिरकी गोलंदाज स्टीफन ओकिफने प्रथमश्रेणी क्रिकेट मधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आगामी राष्ट्रीय क्रिकेट हंगामासाठी करारबद्ध केलेल्या क्रिकेटपटूंच्या न्यू साऊथ वेल्स यादीमध्ये ओकिफचा समावेश करण्यात आला नाही. 35 वर्षीय ओकिफ हा ऑस्ट्रेलियन कसोटी संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने 9 कसोटीत 35 बळी घेतले आहेत. 2017 साली पुण्यात झालेल्या भारताविरूद्धच्या सामन्यात ओकिफने 12 गडी बाद केले होते.
गेल्यावर्षीच्या राष्ट्रीय हंगामात न्यू साऊथ वेल्स संघाने शेफिल्ड ढाल क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत ओकिफने 22.25 धावांच्या सरासरीने 16 गडी बाद केले. ओकिफ प्रथमश्रेणी क्रिकेट मधून निवृत्त झाल्याने आता न्यू साऊथ वेल्स संघाकडे लेयॉन एकमेव फिरकी गोलंदाज राहिला आहे.