प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे प्रतिपादन : अखिल भारतीय सुवर्णकार समितीतर्फे ऑनलाईन व्याख्यानमाला
प्रतिनिधी / बेळगाव
निसर्गाशी संवाद साधता आला तर आपल्याला आयुष्याचा अर्थ समजतो. संवेदना बोथट होऊ न देता जबाबदारी आणि ओझे यातला फरक जाणून घेणे म्हणजे आयुष्य होय. प्रत्येकाच्या अपेक्षांचे ओझे व्यापक आणि मोठे असते. ते मर्यादित ठेवून जगण्यासारखा दुसरा आनंद नाही, असे प्रतिपादन हलकर्णी (ता. चंदगड) कॉलेजचे प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले.
अखिल भारतीय सुवर्णकार समितीतर्फे आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ‘आयुष्याच्या वाटेवर जगताना’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र पोतदार होते.
डॉ. चंद्रकांत पोतदार पुढे म्हणाले, आयुष्याच्या प्रवासातील प्रत्येक टप्पा पार करताना माणसाला निसर्गाशी संवाद साधता आला तर जगण्यातील हा प्रवास सुखकर होतो. संघर्षमय आयुष्य आपल्याला बरेच काही शिकविते, असे मत त्यांनी मांडले. यावेळी स्वागत अविनाश मुखरे यांनी केले. प्रास्ताविक नंदकुमार वेदपाठक यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यानमालेत पुणे जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, साहित्यिक बबन पोतदार, प्रा. निलेश शिंदे, निलेश पोतदार, वैभव मन्नोळकर, वर्षा चव्हाण, रणजित पोतदार, संजय माणकापुरे, संजय माणकापुरे आदी सहभागी होते.