प्रतिनिधी/ बांदा:
गोव्याहुन सोलापूरच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीवर ओटवणे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत 3 लाख 15 हजार 840 रुपयाची दारू, 5लाख रुपये किमतीची गाडी व 1 मोबाईल असा एकूण 8 लाख 20 हजार 840 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. हि कारवाई मध्यरात्री दीड वाजता राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुली व भरारी पथक सातारा यांनी केली. या कारवाईत समाधान शिवाजी चवरे वय 27 व समाधान मारुती चव्हाण वय 28, दोघेही रा. पेनूर, ता मोहळ, जिल्हा सातारा यांच्यावर कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, बांदा दाणोली मार्गावरील ओटवणे येथे गोव्यातुन येणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी सुरु होती. बांदा आंबोली वरून सोलापूर मध्ये गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला होती.त्यानुसार इन्सुली व सातारा पथक ओटवणे येथे ठाण मांडून होते.दरम्यान रात्री दीडच्या सुमारास गोव्याहुन आंबोलीच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ एमएच04 जीएम8067 आली असता थांबण्याचा इशारा केला.गाडीची तपासनी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू असल्याचे उघड झाले. गोवा बनावटीच्या दारूचे 35 बॉक्स आढळून आले.दरम्यान गोवा बनवटीच्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघा संशयितसह , मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क ने ताब्यात घेतला. हि कारवाई अधीक्षक बी एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शिवाजी काळे, दुय्यम निरीक्षक एन पी क्षीरसागर, जी एल राणे, रमेश चंदुरे,संदीप कदम यांच्या सह इन्सुली व सातारा पथकाने केली.