बर्मिंगहम / वृत्तसंस्था
यॉर्कशायर कौंटी क्रिकेट क्लबने बुधवारी ओटिस गिब्सन यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली. नव्या कराराप्रमाणे गिब्सन पुढील 3 वर्षे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 पासून सुरु होईल. यॉर्कशायर क्रिकेटचे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक डॅरेन गॉ यांच्याकडे गिब्सन आपला अहवाल सादर करतील. गिब्सन यांच्यासाठी लवकरच दोन नवे सहायक नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती यॉर्कशायर क्लबने दिली. गिब्सन यांनी विंडीज व दक्षिण आफ्रिकन संघाचे मुख्य प्रशिक्षक तर इंग्लंड व बांगलादेशसाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. माजी विंडीज अष्टपैलू गिब्सन यांनी आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत 2 कसोटी व 15 वनडे सामने खेळले आहेत. 52 वर्षीय गिब्सन यांना कौंटी क्रिकेटचाही उत्तम अनुभव आहे.