पहिल्या इंडियन ओरिजिनलमध्ये लारा दत्ता
नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्नेप्लस हॉटस्टार, झी5, एमएक्स प्लेयर, ऑल्ट बालाजी यासारख्या अनेक देशी-विदेशी ओटीटी प्लॅटफॉर्म्सदरम्यान आता लायन्सगेट प्लेने स्वतःची उपस्थिती नोंदविली आहे. भारतीय ओटीटी कंटेंट स्पेसमध्ये लायन्सगेट प्लेला नवा खेळाडू मानले जातेय. पण हॉलिवूड स्टुडिओने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भारतात ओटीटी सेवा सादर केली होती. पण आता लायन्सगेट प्ले स्वतःचे पहिले इंडियन ओरिजिनल शो ‘हिक्कप्स अँड हुकअप्स’ प्रदर्शित करत आहे.
या शोमध्ये लारा दत्ता, राजकुमार राव, प्रतीक बब्बर आणि शिनोवा मुख्य भूमिकांमध्ये दिसून येतील. या शोचे दिग्दर्शन कुणाल कोहलीने पेले आहे. लायन्सगेट प्लेवर 26 नोव्हेंबर रोजी हा शो स्ट्रीम करण्यात येणार आहे. दिव्या सेठ, नासर अब्दुल्ला, खालिद सिद्दीकी, म्यांग चेंग, मीरा चोप्रा आणि आयन जोया देखील या शोमध्ये दिसून येणार आहेत. या शोची कहाणी सिंगल मदर आणि तिच्या भावाच्या जीवनावर आधारित आहे. सिंगल मदरच्या भूमिकेत लारा तर तिच्या भावाच्या भूमिकेत प्रतीक आहे. लाराने इन्स्टाग्रामवर याचा प्रोमो शेअर केला आहे.