क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
ओडिशा एफसीचा 3-1 गोलानी पराभव करून नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने आयएसएल फुटबॉल स्पर्धेत शानदार विजयाची नोंद केली. वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यातील विजयाने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने तीन गुणानी तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे.
नॉर्थईस्ट युनायटेड एफसीसाठी लुईस माशादोने दोन तर एक गोल डिशॉर्न ब्राऊनने केला. पराभूत ओडिशा एफसीचा एकमेव गोल ब्रॅड्डन इनमनने नोंदविला. हे चारही गोल सामन्याच्या पहिल्या सत्रात झाले. या निकालाने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे 17 सामन्यांतून सहा विजय, आठ बरोबरी व तीन पराभवाने 26 गुण झाले. पराभूत ओडिशा एफसीचे 17 सामन्यांतून एक विजय, सहा बरोबरी आणि दहा पराभवाने 9 गुण झाले व त्यांचे शेवटचे स्थान कायम राहिले. आता एफसी गोवा संघ चौथ्या तर हैदराबाद एफसीचा संघ पाचव्या स्थानावर गेला आहे.
नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने पहिल्या 24 मिनिटांतच तीन गोल करून तिथेच आपला विजय निश्चित केला. सामनावीर ठरलेल्या फॅडेरिको गॅलेगो, डिशॉर्न ब्राऊन आणि लुईस माशादो यांच्या झंझावती खेळासमोर ओदिशा एफसीची बचावफळी पार खिळखिळी झाली. सामन्याच्या नवव्याच मिनिटाला आशुतोष मेहताच्या पासवर लुईस माशादोने ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंगला भेदले आणि आघाडीवर नेले.
त्यानंतर लगेच फॅडेरिको गॅलेगोचा गोल करण्याचा यत्न गोलच्या आडव्या पट्टीवरून गेल्याने वाया गेला. फॅडेरिकोच्या पासवर डिशॉर्न ब्राऊनने 19व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा दुसरा गोल करून संघाची आघाडी वाढविली. लगेच पाच मिनिटांनी लुईस माशादोने फॅडेरिको गॅलेगोच्या क्रॉसवर हेडरने अर्शदीप सिंगला भेदले आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा तिसरा गोल केला.
ओडिशा एफसीने सामन्यातील आपली धोकादायक चाल लढतीच्या 33व्या मिनिटाला केली. यावेळी ब्रॅड्डेन इनमनने हाणलेला फटका नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा गोलरक्षक सुभाषिश रॉयने अडविला. मध्यंतराच्या ठोक्याला ब्रॅड्डेन इनमनने डॅविड लालथेमपुईच्या पासवर गोल करून ओडिशाची पिछाडी एक गोलाने कमी केली.
दुसऱया सत्रातही नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा आक्रमक खेळ चालूच राहिला. लुईस माशादो आणि फॅडेरिको गॅलेगो यांचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. सामना संपण्यास सहा मिनिटे शिल्लक असताना ब्रॅड्डन इनमनच्या क्रॉसवर स्टीवन टेलरचा हेडर गोलच्या आडव्या पट्टीला आदळला. सामना संपण्यास चार मिनिटे शिल्लक असताना नॉर्थईस्ट युनायटेड एफसीच्या गुरजिंदर सिंगला सामन्यात दोन एलो कार्डे पडल्याने रेड कार्ड दाखवून बाहेर घालविण्यात आले. शेवटच्या क्षणी अर्शदीप सिंगने डिशॉर्न ब्राऊनचा फटका अडविल्याने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची चौथा गोल करण्याची संधी हुकली.