ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
ओडिशात कोरोना लढाईत सहभागी असलेले डॉक्टर्स, नर्स तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 14 दिवस सक्तीच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना समूह संसर्गाचा धोका अधिक असल्याने ओडिशा सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ओडिशा राज्यात एकूण 24 कोविड-19 रुग्णालये आहेत. तर आणखी 11 रुग्णालये 20 एप्रिलपर्यंत सुरू केली जाणार आहेत. या रुग्णालयांमधून डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी महिन्यातून पंधरा दिवस काम करणार आहेत. पंधरा दिवस काम केल्यानंतर या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे 14 दिवस सक्तीचे विलगीकरण करण्यात येईल. दरम्यानच्या काळात दुसरे डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी रुग्णालयात काम करणार आहेत. या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत सुरक्षा संचही दिले जाणार आहेत.