ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
ओडिशा राज्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला आहे. येथील रुग्णालयात 72 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या रुग्णाला येथील ‘एम्स’मध्ये 4 एप्रिलला दाखल करण्यात आले होते. त्याला श्वसनाचा त्रास होत होता. तो झारपाडा येथील रहिवासी होता. त्याला यापूर्वी उच्च रक्तदाबाचा त्रासही होता. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य विभाग घेत आहे. दरम्यान, भुवनेश्वर शहरात आणखी एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती मधुसूदननगर परिसरातील रहिवासी असून, तो 25 वर्षांचा आहे. तो परदेशातून आला आहे अथवा नाही, याची माहिती अद्याप आरोग्य विभागाने दिलेली नाही.
राज्यात कोरोनाचे 42 रुग्ण
ओडिशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 42 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात आढळलेला कोरोनाचा पहिला रुग्ण उपचार घेऊन घरी परतला आहे. सध्या राज्यभरात विविध रुग्णालयांमध्ये 87 जण विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत.