क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
जॅरी मावीहमोंगथांगाने दुसऱया सत्रात नोंदविलेल्या दोन गोलांच्या बळावर ओडिशा एफसीने एका धक्कादायक विजयाची नोंद करताना अग्रस्थानावर असलेल्या मुंबई सिटी एफसी संघाला 4-2 गोलानी पराभूत केले. वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात मध्यंतरावेळी गतविजेता मुंबई सिटी एफसीचा संघ 2-1 असा आघाडीवर होता.
ओडिशा एफसीचा अन्य गोल आरिदाय सुवारेझ आणि जोनाथस ख्रिस्टियानने केले. मुंबई सिटी एफसीसाठी इगोर अँग्युलो आणि अहमद जाहू यांनी गोल केले. मुंबई सिटी एफसीचा हा नवव्या सामन्यांतील तिसरा पराभव. त्यांचे आता 9 सामन्यांतून पाच विजय व एका बरोबरीने 16 गुण आणि अग्रस्थानही कायम आहे. ओडिशा एफसी संघाने नवव्या सामन्यांतून आपला चौथा विजय साकारला. त्यांचे आता चार विजय व एका बरोबरीने 13 गुण झाले असून ते सातव्या स्थानावर आहेत.
सामन्याची सुरूवात धडाकेबाज पद्धतीने करताना ओडिशा एफसीने चौथ्याच मिनिटाला अग्रस्थानावर असलेल्या आणि गतवर्षीय विजेता मुंबई सिटी एफसीवर गोल नोंदविला. झेवियर हर्नांडिझच्या पासवर आरिदाय सुवारेझने मुंबईचा गोलरक्षक मोहम्मन नवाजला भेदले व चेंडूला गोलची दिशा दाखवली. आरंभालाच घेतलेली ही आघाडी ओडिशा एफसी जास्त वेळ टिकवू शकले नाहीत. अकराव्या मिनिटाला कॅस्सियो ग्रेब्रियलने दिलेल्या पासवर अहमद जाहूने प्रतिस्पर्धी गोलरक्षक कमलजीत सिंगला वेगळय़ा कोंडीत पकडून मुंबईला 1-1 अशा बरोबरीत आणले.
बरोबरीनंतर मुंबई सिटी एफसीने आपल्या खेळाची गती वाढविली आणि ओडिशावर कित्येक आक्रमणे रचली. लढतीच्या 38व्या मिनिटाला त्यांचे गोल मशीन म्हणून संबोधल्या जाणाऱया इगोर अँगुलोने गोल करून मुंबई सिटीला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ओडिशाचा गोलरक्षक कमलजीत सिंगच्या चपळ गोलरक्षणामुळे पहिल्या सत्रात मुंबईची आघाडी एक गोलपर्यंत मर्यादित राहिली. मुंबईच्या रेनर फर्नांडिस तसेच इगोर अँग्युलो आणि बिपीन सिंगचे गोल करण्याचे यत्न कमलजीतने अडविले.
दुसऱया सत्रात सात मिनिटांच्या अवधीत ओडिशा एफसीने लागोपाठ दोन गोल केले आणि मुंबई सिटी एफसीवर 3-2 अशी आघाडी मिळविली. प्रथम 70 व्या मिनिटाला जॅरी माविहमोंगथांगाने गोल करून 2-2 अशी बरोबरी साधल्यानंतर त्यानेच 77 व्या मिनिटाला जोनाथस ख्रिस्टियानच्या पासवर ओडिशा एफसीचा तिसरा गोल केला. सामना संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना जोनाथस ख्रिस्टियानने ओडिशाचा चौथा गोल करून विजय अधिक सोपा केला.