क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेला ओडिशा एफसी आणि चेन्नईन एफसी यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत संपला. चेन्नईन एफसीसाठी रहिम अली आणि नेरीजूस वाल्सकीसने तर ओडिशा एफसीसाठी झेवियर हर्नांडिझ व जोनाथस ख्रिस्टियानने गोल केले.
या निकालाने दोन्ही संघांना प्रत्येकी गुण प्राप्त झाला. ओडिशा एफसीचे आता 17 सामन्यांतून 6 विजय, 4 बरोबरी व 7 पराभवांनी 22 गुण झाल. चेन्नईन एफसीचे 16 सामन्यांतून 5 विजय, 5 बरोबरी व 7 पराभवांनी 20 गुण झाले. आयएसएलच्या गुणतलिकेत या निकालोन ओडिशाचे सातवे तर चेन्नईनचे आठवे स्थान कायम राहिले.
सामन्याच्या दुसऱयाच मिनिटाला चेन्नईन एफसीने गोल करून आघाडी घेतली. ओडिशा एफसीच्या थोयबा सिंगने डी कक्षेबाहेर फाऊल केल्याने चेन्नईन एफसीला फ्रिकीक बहाल झाली. यावेळी नेरीजूस वाल्सकीसने मारलेली फ्रिकीक प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या ‘वॉल’ला आदळून परत आल्यानंतर रहीम अली याच्याकडे आली. रहीम अलीने संधीचा फायदा घेत ओडिशा एफसीचा गोलरक्षक अर्शदीप सिंगला भेदले व चेंडूला गोलची दिशा दाखवली.
चेन्नईन एफसीची ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही. लगेच 18व्या मिनिटाला जोनाथस ख्रिस्टियानच्या पासवर झेवियर हर्नांडिझने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर चेन्नईन एफसीच्या अरियल बोरिसियूक गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला तर 45व्या मिनिटाला ओडिशा एफसीच्या जोनाथस ख्रिस्टियानची संधी प्रतिस्पर्धी गोलरक्षक देबजित मजुमदारने फोल ठरवली.
दुसऱया सत्रातील 51 व्या मिनिटाला ओडिशा एफसीने परत एकदा आघाडीचा गोल केला. जोनाथस ख्रिस्टियानने हा गोल केला. ओडिशाची ही आघाडी चेन्नईन एफसीने 69व्या मिनिटाला गोल करून समाप्त केली. हा गोल रहिम अलीच्या पासवर नेरीजूस वाल्सकीसने केला.