वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भारतीय हॉकी संघातून खेळलेल्या राज्यातील खेळाडूंचा बुधवारी सत्कार केला आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल त्यांना रोख पुरस्कार देऊन सन्मानित केले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर पदक जिंकताना कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला. या संघातील ओडिशाचे सदस्य बिरेंद्र लाक्रा व अमित रोहिदास यांना पटनायक यांनी प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांचा धनादेश दिला. महिला हॉकी संघानेही या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची अपूर्व कामगिरी केली. या संघातील दीप ग्रेस एक्का व नमिता टोपो यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा धनादेश दिला. लाक्रा व अमित रोहिदास यांना राज्य पोलीस दलात डीएसपी पदी नियुक्ती केल्याचे पत्रही याप्रसंगी पटनायक यांनी त्यांच्याकडे दिले. कलिंगा स्टेडियमवर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी दोन्ही संघांच्या कामगिरीची प्रशंसा करून हाच जोम पुढे चालू ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचा सल्लाही दिला. खेळाडूंनीही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सत्काराबद्दल आणि पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लाक्राने संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱया असलेली संघाची जर्सी त्यांना प्रदान केली तर एक्काने महिला संघाची जर्सी त्यांच्याकडे सुपूर्द केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करून कांस्यपदक मिळविले. महिला संघाला मात्र कांस्यपदकाच्या लढतीत झुंजार खेळ केल्यानंतरही ग्रेट ब्रिटनकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे पदक हुकले होते.