ऑनलाइन टीम / ओडिशा :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार देखील बंद करण्यात आले आहेत. तरी देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्य लॉक डाऊन वाढवण्याच्या विचारात आहेत.
यातच आता ओडिशा सरकारने लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
याबाबत माहिती देताना ओडिशा चे मुख्यमंत्री नवीन पटनाईक म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओडिशा मध्ये आता 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन सुरू राहणार आहे. तसेच 17 जून पर्यंत ओडिशातील शैक्षणिक संस्था बंद ठेवल्या जातील.
याच बरोबर त्यांनी केंद्र सरकारकडे 30 एप्रिलपर्यंत देशातील विमानसेवा, रेल्वे सेवा सुरू करू नये अशी मागणी देखील केली आहे.
दरम्यान, लॉक डाऊन संपायला सात दिवस बाकी असताना महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आसाम राजस्थान उत्तर प्रदेश आणि झारखंड सरकारने आधीच लॉक डाऊन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.