प्रतिनिधी /बेळगाव
मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या कामाचा भार अतिथी शिक्षकांवर लादत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आता ‘ओदू कर्नाटक’ योजनेचे कामही अतिथी शिक्षकांवर सोपवून मुख्याध्यापक आणि शिक्षक कामचुकारपणा करीत आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेळगाव, बेळगाव शहर आणि खानापूर तालुक्यातील काही शाळांतील अतिथी शिक्षकांना अतिरिक्त कामे लावली जातात. काही शिक्षक शाळेला दांडी मारून अतिथी शिक्षकांना शाळा सांभाळायला लावतात. शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी अतिथी शिक्षकांची नियुक्ती केली पण मुख्याध्यापक व शिक्षकांच्या कामचुकारपणामुळे हा हेतू लोप पावत असल्याचा आरोप होत आहे. शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी त्याला दुजोरा दिला. पण तक्रारी येत नसल्याने कारवाई कुणावर करणार, हा प्रश्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी ओदू कर्नाटक योजना राबविली जाते. त्यावर मुख्याध्यापक व अनुभवी शिक्षकांनी काम करणे, अपेक्षित आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना दिले आहे. मात्र नेहमीप्रमाणेच या योजनेच्या कामातही अतिथी शिक्षकांना जुंपण्यात येत आहे. परिणामी योजनेचा बटय़ाबोळ होण्याची चिंता व्यक्त होत आहे. तसेच अतिथींवरील कामाचा ताण कमी करून त्यांना अध्यापनासाठी वेळ द्यावा, अशी मागणी होत आहे.
कारवाई का नाही?
अतिथी शिक्षकांच्या पिळवणुकीबाबत तक्रारी आहेत पण आपल्यावरच कारवाई होऊन हातचा रोजगार जाईल. या भीतीने कुणीच तक्रारी नोंदविण्यासाठी पुढे येत नाही.