प्रभाग आरक्षण सोडतीपूर्वी दिग्गजांची मोर्चेबांधणी : खुला झाल्यास उमेदवारांची गर्दी वाढणार
संजीव खाडे / कोल्हापूर
महापालिकेच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत बाजार गेट प्रभाग आजवर नेहमीच लक्षवेधी ठरत आला आहे. लक्ष्मीपुत्ररूपी दिग्गज उमेदवार आणि त्यांच्याकडून होणारे लक्ष्मीदर्शन यामुळे या प्रभागातील आजवरची निवडणूक गाजत आली आहे. गेल्यावेळी ओबीसी महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग : महिला) असणारा हा प्रभाग यंदा ओपन (सर्वसाधारण) होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच हॉटस्पॉट बनला आहे. अनेक दिग्गज उमेदवारांनी या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी केली असून प्रभाग आरक्षण सोडतीपूर्वीच बाजार गेट प्रभाग शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
महापालिकेच्या राजकारणात महापालिकेची इमारत ज्या प्रभागात येते तो प्रभाग असणारा बाजार गेट प्रभाग. यामध्ये होलसेल, रिटेलची बाजार पेठ आहे. चप्पल लेनचा एक भाग, छत्रपती शिवाजी मार्केट, पापाची तिकटी, पानलाईन, कुंभार गल्ली, काळाईमाम तालीम, ऋणमुक्तेश्वरची मंडई आदी भाग येतो. कुंभार, जोशी, तेली, गवळी, लिंगायत, कोरवी या जातींच्या मतदारांचे या प्रभागात प्राबल्य आहे. मुस्लिम मतदारही मोठÎा संख्येने आहेत. बनछोडे, गजगेश्वर आणि सांगावकर या घराण्यातील उमेदवार गेल्या पाच निवडणुकीत जिंकत आले आहेत. 1995-2000 मध्ये सुवर्णा सांगावकर (आरक्षण : सर्वसाधारण महिला) निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2000-2005 आणि 200-2010 या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे नंदकुमार गजगेश्वर (आरक्षण : सर्वसाधारण) जिंकले होते. त्यानंतर 2010 ते 2015 मध्ये श्रीकांत बनछोडे (आरक्षण : सर्वसाधारण) आणि त्यानंतर 2015 मध्ये त्यांच्या स्नुषा काँग्रेसच्या उमेदवार उमा शिवानंद बनछोडे (आरक्षण : ओबीसी महिला) विजयी झाल्या होत्या.
आता हा प्रभाग ओपन (सर्वसाधारण) किंवा ओबीसी (नागरिकांचा मागासवर्ग) होण्याची शक्यता असल्याने बनछोडे, सांगावकरांसह इतर दिग्गजांनी मोर्चेबांधणी केली आहे. उमा बनछोडे यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सांगावकर घराण्यात विश्वनाथ सांगावकर किंवा त्यांचा मुलगा अभिजित सांगावकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जोशी समाजाचे नेते असणारे भाजपचे भरत काळे हे रिंगणात असणार आहेत. माजी स्थायी समिती सभापती आणि जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय साळोखे-सरदार यांनीही तयारी केली आहे. माजी नगरसेवक निशिकांत मेथे यांनी दंड थोपाटले आहेत. बिंदू चौक मतदार संघातील माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनीही चाचपणी सुरू केली आहे. माजी विरोधी पक्ष नेते किरण शिराळे यांच्याही नावाची चर्चा आहे. कुंभार आणि मुस्लिम समाजातूनही ऐनवेळी उमेदवार येऊ शकतो. विशेष म्हणजे चर्चेत असलेल्या इच्छुक उमेदवारांपैकी काहींचा अपवाद वगळता इतर लक्ष्मीपुत्र आहेत. त्यामुळे आधीच्या अनुभवाप्रमाणे यंदाचीही निवडणूकही लक्ष्मीदर्शनाने गाजण्याची शक्यता आहे. प्रभाग आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
ऋतुराज क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्या नावाचीही बाजार गेट प्रभागात चर्चा आहे. क्षीरसागर यांच्याकडून प्रभागातील राजकीय स्थितीचा अंदाज घेतला जात आहे. ऋतुराज निवडणूक रिंगणात उतरले तर ती लक्षवेधी ठरणार आहे.