नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता याप्रकरणी उद्या, 19 जानेवारी रोजी महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. बुधवारी होणाऱया सुनावणीत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. साहजिकच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या निकषानुसार होणार हे ठरविण्यासाठी 19 जानेवारीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय याआधीच दिला आहे. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करून त्यानंतरच आरक्षण द्यावे, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यावर मध्यप्रदेश सरकारने विधिमंडळात ठराव करून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्यपालांमार्फत निवडणूक आयोगाकडे केली आहे.