पीएनजी संघाविरुद्ध 10 गडी राखून एकतर्फी बाजी, जतिंदर-अकिबची 130 धावांची अभेद्य भागीदारी
अल अमेरात (ओमान) / वृत्तसंस्था
लुधियानाचा जन्म असलेल्या जतिंदर सिंगने नाबाद 73 धावांची अभेद्य खेळी साकारल्यानंतर सहयजमान ओमानने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीतील लढतीत पापुआ न्यू गिनिया (पीएनजी) संघाचा 10 गडय़ांनी एकतर्फी फडशा पाडला. जतिंदरची 42 चेंडूतील झंझावाती खेळी आणि त्याचा सहकारी सलामीवीर अकिब इलियासच्या (43 चेंडूत नाबाद 50) समयोचित योगदानामुळे ओमानने 130 धावांचे टार्गेट अवघ्या 13.2 षटकातच सर केले.
पीएनजीचा एकही गोलंदाज जतिंदर व अकिबची फटकेबाजी किंचीतही रोखू शकला नाही. जतिंदरने 7 चौकार व 4 षटकार फटकावले तर अकिबच्या डावातही 5 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला.
मंदगती गोलंदाजांविरुद्ध अधिक प्रभावशाली खेळणाऱया जतिंदरने प्रारंभापासूनच आक्रमक पवित्र्यावर भर दिला होता. तत्पूर्वी, कर्णधार असद वालाने (43 चेंडूत 56) शानदार अर्धशतक झळकावल्यानंतरही पीएनजीला 9 बाद 129 या किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले.
प्रतिस्पर्धी कर्णधार झीशान मकसूदने 20 धावात 4 बळी घेत पीएनजीच्या डावाला मोठा सुरुंग लावला. मकसूदला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पीएनजीचे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाले आणि येथूनच त्यांच्या डावाची पडझड सुरु झाली होती. ओमान आता मंगळवारी बांगलादेशविरुद्ध तर पीएनजीचा संघ त्याच दिवशी स्कॉटलंडविरुद्ध पुढील लढतीत खेळणार आहे.