नागाळा पार्कातील ओमिक्रोन बाधिताची मुलगीही पॉझिटीव्ह
कोल्हापूर / प्रतिनिधी
शहरात ओमिक्रॉन रूग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी नागाळा पार्क येथे एक रूग्ण आढळून आला असतानाच मंगळवारी आणखीन तीन रूग्णांचे ओमिक्रॉनचा अहवाल पॉझिटीव्ह आले. नागाळा पार्क, सुर्वेनगर आणि साईक्स एक्सटेंशन येथील हे रूग्ण आहेत. यामध्ये सोमवारी नागाळा पार्क येथील सापडलेल्या व्यक्तीच्या मुलगीचा समावेश आहे. तसेच जर्मनी आणि अमेरिकाहून आलेले दोघांचेही ओमिक्रॉनचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दोन दिवसांत चार रूग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे.
कोल्हापुरात हनुमाननगर परिसरात पहिला ओमिक्रॉनचा रूग्ण आढळून आला होता. यानंतर सोमवारी नागाळा पार्क, राजहंस प्रिटींग प्रेस परिसरातील 57 वयाचा व्यक्तीचा ओमिक्रॉनचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तर मंगळवारी आणखीन तीन जण ओमिक्रॉन बाधित सापडल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
यामध्ये नागाळा पार्क येथील 57 वयाच्या व्यक्ती मंगळवारी ओमिक्रॉन पॉझिटीव्ह झाली होती. त्यांची मुलगी गोव्याहून आल्यामुळे त्यांना संसर्ग झाल्याचा धोका वर्तवला जात होता. मुलगीचा अहवाल प्रलंबित होता. तो मंगळवारी ओमिक्रॉन पॉझिटीव्ह आला. दुसरी ओमिक्रॉन पॉझिटीव्ह व्यक्ती 47 वयाची असून मुळची साईक्स एक्स्टेंशन परिसरातील रहिवाशी आहे. ती जर्मनीवरून 21 डिसेंबर रोजी दुबई, दिल्ली, पुणे, सातारातून कोल्हापुरात आलेली आहे. 24 डिसेंबर रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने 27 रोजी त्यांनी आरटीपीसीआर केले. तसेच ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्याला स्वॅब पाठविला होता. त्यांचा मंगळवारी अहवाल ओमिक्रॉन पॉझिटीव्ह आला. त्यांनी दोन्ही डोस घेतले आहे. संपर्कातील हायरिस्कमधील 15 तर 22 लो रिस्कमधील नागरिकांचे स्वॅब घेतले असून त्यांची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आली आहे.
तिसरी व्यक्ती सुर्वेनगरातील असून 57 वयाची आहे. 24 डिसेंबरला अमेरिकेतून आले असता त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. मात्र, कोल्हापुरात आल्यानंतर 25 डिसेंबरला त्यांना त्रास सुरू झाल्याने ओमिक्रॉनची तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आला. संपर्कातील 12 जण हायरिस्कमधील असून लो रिस्कमधील 5 जण आहे. त्यांचे स्वॅब घेतले असून सर्व निगेटिव्ह आले आहेत.