ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे तात्काळ निदान करणारे ‘ओमिशुअर’ हे किट आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. ओमिशुअर हे टेस्ट किट टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडने विकसित केले असून, या किटला आयसीएमआरने 30 डिसेंबर रोजी मान्यता दिली होती.
ओमिशुअर हे टेस्ट किट इतर आरटी-पीसीआर टेस्ट किटप्रमाणेच काम करेल. ओमिक्रॉनच्या चाचणीसाठीही नाकातील किंवा घशातील स्वॅब घेतला जाईल. त्यानंतर केवळ 10 ते 15 मिनिटांत चाचणीचा अंतिम अहवाल आरटी-पीसीआरसारख्या इतर चाचण्यांप्रमाणे येईल. ओमिशुअर किटने टेस्ट करण्याची पद्धत इतर आरटी-पीसीआर चाचण्यांपेक्षा वेगळी नसेल.
टाटा मेडिकलने ओमिशुअर टेस्ट किटची किंमत प्रति टेस्ट 250 रुपये निश्चित केली आहे, जी बाजारात उपलब्ध असलेल्या सध्याच्या इतर चाचणी किटपेक्षा स्वस्त आहे. तथापि, प्रयोगशाळांकडून चाचणीसाठी अतिरिक्त शुल्क घेतले जाऊ शकते. कारण ही टेस्ट घरी करण्यासारखी नाही. त्यामुळे लॅबचे पैसे आकारण्यात येऊ शकतात. दरम्यान, टाटा मेडिकलची दरमहा 2,00,000 टेस्ट किट तयार करण्याची क्षमता आहे. ओडिशा स्टेट मेडिकल कॉर्पोरेशन लिमिटेडने पाच लाख ओमिशुअर किटची ऑर्डर दिली आहे. ओमिशुअर किट मागवणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.