ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशात फैलावणाऱ्या कोरोनाचा नव्या व्हेरियंटचा वेग पाहता केंद्र सरकार व राज्य सरकारने कोरोना लसीकरण मोहिम अधिक तीव्र केली आहे. तसेच कोरोना निर्बंध ज्या – त्या शहराच्या स्थितीनुसार निर्णय घेतले जात आहेत. वेगाने वाढणाऱ्या ओमिक्रॉनचा देशात फैलावण्याचा वेग स्थिर न झाल्यास देशात संक्रमणाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर दिल्लीत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढल्याने मंगळवार दि. 28 डिसेंबर रोजी यलो अलर्ट घोषित झाला आहे. त्यानुसार शाळा-कॉलेज, सिनेमागृहे, जिम पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने सम-विषमप्रमाणे सुरू राहतील.
मेट्रो व बस ५० टक्के क्षमतेने धावतील. त्यात उभे राहून प्रवासाची परवानगी नसेल. मंगल कार्यालये, स्पा, मोकळ्या मैदानात योगासने, मनोरंजन पार्क, स्विमिंग पूल आदी बंद राहतील. दरम्यान, २२ राज्यांत ओमिक्रॉनचे ७०१ रुग्ण झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवारी म्हणाले, लेव्हल-१ च्या अलर्ट अंतर्गत रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू लागू राहील. अत्यावश्यक वस्तूंची कार्यालये वगळता इतर खासगी कार्यालये ५०% उपस्थितीने चालतील. लग्न व अंत्यसंस्कारांत कमाल २० जणांनाच सहभागी होता येईल. इतर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व उत्सव संबंधी कार्यक्रम होणार नाही.