ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील 17 राज्य आणि केंदशासित प्रदेशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ पाऊले उचलत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या 10 राज्यात केंद्रीय पथके तैनात केली आहेत.
या राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवडलेल्या या राज्यांमध्ये तीन ते पाच दिवस केंद्रीय पथके तैनात असतील. ही पथके कोविड-19 लसीकरणाच्या ग्राउंड रिऍलिटीवरही लक्ष ठेवतील. तसेच राज्यातील वैद्यकीय तज्ञांना प्रशिक्षण देतील. संपर्क शोध, कोव्हिड-19 चाचणी, कोव्हिड-19 वरील मार्गदर्शक तत्त्वे रुग्णालयांमधील खाटा, रुग्णवाहिका, ऑक्सजिनची उपलब्धता आणि लसीकरणाचा दर्जा यावरही अहवाल तयार करतील आणि केंद्राला सादर करतील.
17 राज्यांमध्ये ओमिक्रॉनची पुष्टी
एका महिन्याच्या आत देशातील 17 राज्य आणि केंदशासित प्रदेशांमध्ये 415 ओमिक्रॉन संसर्गितांची पुष्टी झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 108, दिल्लीत 79, गुजरात 43, तेलंगणा 38, केरळ 37, तामिळनाडू 34, कर्नाटक 31, राजस्थान 22, हरियाणा 4, ओडिशा 4, आंध्रप्रदेश 4, जम्मू-कश्मीर 3, पश्चिम बंगाल 3, उत्तर प्रदेश 2, चंडीगढ 1, लडाख 1, उत्तराखंड 1 असे एकूण 415 रुग्ण आढळून आले आहेत.