पंतप्रधानांनी घेतला वैद्यकीय – लसीकरणाचा आढावा : परिस्थितीनुरुप नियमावली राबविण्याची केंद्राकडून राज्यांना सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून गुरुवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणांच्या पूर्वतयारीवर चर्चा करण्यात आली. तसेच पंतप्रधानांनी अधिकाऱयांना औषधे आणि ऑक्सिजनचा साठा सुधारण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच देशभरात लसीकरण वाढवण्यासाठी वेगाने काम करण्यास सांगितले आहे. तसेच देशात ओमिक्रॉन व्हेरियंट वेगाने हातपाय पसरत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना नव्या सूचना जारी केल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना विरोधातील लढाई कायम ठेवावी, त्यासाठी तयार राहावे, धैर्य सोडू नये असा सल्ला केंद्राने राज्यांना दिला आहे.
देशातील ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी अधिकाऱयांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झालेली बैठक तासभर चालली. यामध्ये आरोग्य विभागासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कमी लसीकरण झालेल्या जिल्हय़ांची माहिती घेऊन तेथे मोहीम तीव्र करण्याची सूचना मोदींनी अधिकाऱयांना केली. लसीकरण करताना येणाऱया अडचणींबाबत राज्य सरकारशी बोलून त्या लवकरात लवकर दूर कराव्यात आणि अधिकाधिक लोकांना लसीकरण करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी अधिकाऱयांना सांगितले.
देशात ओमिक्रॉनचे एकूण 355 रुग्ण
देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. नवीन व्हेरियंटने चिंतेत भर टाकली आहे. गुरुवारी 4 राज्यांमध्ये ओमिक्रॉनची 64 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये तामिळनाडूमध्ये 33, तेलंगणामध्ये 14, कर्नाटकमध्ये 12 आणि केरळमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत. यानंतर, नवीन प्रकाराने संक्रमित रुग्णांची संख्या देशभरात 355 झाली आहे. ओमिक्रॉनची सर्वाधिक 65 बाधित महाराष्ट्रात आहेत. तसेच 64 प्रकरणांसह दिल्ली दुसऱया तर तेलंगणा 38 प्रकरणांसह तिसऱया क्रमांकावर आहे.
दिल्ली, मध्यप्रदेशात निर्बंधांमध्ये वाढ
मध्यप्रदेश आणि दिल्ली सरकारने बुधवारी ओमिक्रॉन प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवांवर बंदी घातली. बार आणि सिनेमा हॉल देखील 50 टक्के क्षमतेने उघडतील. याशिवाय गर्दी जमवणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नवीन आदेश जारी केले आहेत. दिल्ली पोलीस आणि प्रशासनाला या आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पाच आठवडय़ांपूर्वीच कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे येथे रात्रीची संचारबंदी मागे घेण्यात आली होती. आता पुन्हा रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य सचिवांकडून राज्यांना दिशानिर्देश
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव व राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या व्यवस्थापकीय संचालकासोबत व्हर्च्युअल बैठक घेतली. यामध्ये लसीकरणासह ओमिक्रॉन विरोधातील लढय़ाच्या तयारीबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबतही राज्यांना महत्त्वाचे दिशानिर्देश जारी केले. ओमिक्रॉनचा वाढता फैलाव लक्षात घेऊन, राज्ये/केंद्रशासित प्रदेश या स्थितीत पोहोचण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करू शकतात आणि निर्बंध लागू करू शकतात, याचा पुनरुच्चार आरोग्य सचिवांनी केला. कोणतेही निर्बंध किमान 14 दिवसांसाठी लागू केले पाहिजेत, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
केंद्राने केलेल्या निवडक सूचना
- आगामी उत्सवांपूर्वी गर्दी टाळण्यासाठी कडक नियम राबवावेत.
- अधिकाधिक चाचण्या करून ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचा शोध घ्यावा.
- जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व क्लस्टर नमुने प्रयोगशाळेत पाठवा.
- लसीकरण न झालेल्यांना तात्काळ पहिला डोस देण्याला प्राधान्य द्या.
- रुग्णालयांमध्ये किमान 30 दिवसांचा औषधांचा साठा राखीव ठेवा.
- रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यात यावी.
- लोकांमध्ये विनाकारण भिती पसरवू नका. अचूकपणे जागृती करा.
- नागरिकांना वारंवार सूचना व माहिती पुरवण्यासाठी तत्पर राहा.
- प्रतिबंधित क्षेत्राच्या बाबतीत कठोर नियंत्रण सुनिश्चित करा.
- सुरुवातीच्या टप्प्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लावण्यात यावी.
- रुग्ण सापडलेल्या क्षेत्रात कंटेनमेट, बफर झोन निश्चित करावेत.
- नव्याने जास्त रुग्ण सापडणाऱया भागात कडक प्रतिबंध सुरू करा.