वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात आता कोरोनाच्या डेल्टा स्वरुपाची जागा ओमिक्रॉन या स्वरुपाकडून घेतली जात आहे अशी माहिती अनेक वैद्यकीय तज्ञांनी दिली आहे. ओमिक्रॉनचे संकट युरोप आणि अमेरिकेत तसेच आफ्रिकेमध्ये अधिक प्रमाणात असून तेथून येणाऱया ज्या प्रवाशांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांपैकी 80 टक्के प्रवासी ओमिक्रॉन बाधित आहेत असे दिसून आल्याचेही तज्ञांनी स्पष्ट केले.
2 डिसेंबरला भारतात ओमिक्रॉनचे पहिले दोन रुग्ण आढळले होते. वर्ष अखेरीस त्यांची संख्या 1 हजाराहून अधिक झाली आहे. तसेच दोघांचा ओमिक्रॉनमुळे मृत्यूही झाला आहे. तथापि कोरोनाचे हे स्वरुप सौम्य लक्षणे दाखविणारे असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे या स्वरुपाचा प्रसार अधिक झपाटय़ाने होत असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी असेल. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही डेल्टा किंवा इतर स्वरुपापेक्षा अधिक असेल असे तज्ञांचे मत आहे.
केंद्र सरकारची सज्जता
ओमिक्रॉनच्या आव्हानाशी दोन हात करण्याची सज्जता केंद्र सरकारने ठेवली असून राज्यांनाही ऑक्सिजनचा साठा आणि औषधे यांची उपलब्धता करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत कोणत्याही ओमिक्रॉन रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता लागलेली नाही. असे विविध राज्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू ओमिक्रॉनमुळे झाला. त्यांनाही ऑक्सिजनची आवश्यकता लागली नव्हती. तथापि इतर गंभीर आजार असल्याने ते बळावून मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत तरी ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत. असे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून केंद्र आणि राज्य यांच्यात योग्य समन्वय राखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
चाचण्या वाढवण्याचा आदेश
कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण शोधण्यासाठी सर्व राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ करावी असेही केंद्र सरकारने सुचविले आहे. ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सरकार चाचणी, विलगीकरण आणि लसीकरण यांवर भर देत आहे. भारताच्या 90 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून 64.40 टक्के लोकांना दुसरा डोसही देण्यात आला असून त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे अशी माहिती देण्यात आली.