प्रतिनिधी /मडगाव
डॉ. शेखर साळकर यांनी अगदी बरोबर सांगितले आहे की, 20 ते 30 जानेवारीपर्यंत ओमिक्रॉनच्या प्रकरणांची संख्या जास्तीत जास्त वाढेल. लोकांना ओमिक्रॉनच्या लाटेची त्यांनी जाणीव करून दिली हे चांगलेच झाले. पण ओमिक्रॉन हा प्राणघातक विषाणू नाही हे त्यांनी नमूद केलेले नाही. जरी तो जास्त वेगाने पसरत असला, तरी डेल्टाप्रमाणे त्यांच्या संसर्गामुळे रुग्णांची स्थिती गंभीर बनणार नाही वा मृत्यू येणार नाही, असे मडगावातील डॉ. व्यंकटेश हेगडे यांनी म्हटले आहे.
आज भीतीचे वातावरण आहे. लोक घाबरले आहेत आणि विधाने करताना डॉक्टरांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे ओमिक्रॉन प्राणघातक नाही, त्याचे कोणतेही गंभीर परिणाम नाहीत. त्याच्या संसर्गाची लक्षणे सौम्य असतील. जशी घसा दुखणे, ताप, खोकला, नाक वाहणे. परंतु गंभीर लक्षणे नाहीत. कारण विषाणूचा फुफ्फुसांवर परिणाम होत नाही. यात फुफ्फुसांना दुखापत, वास किंवा चव जाणे यासारखी लक्षणे नाहीत. त्याचप्रमाणे मेंदूवर परिणाम होणार नाहीत. डीप व्हेन थ्रोम्बोसिस, विरामियासारख्या इतर कोणत्याही गंभीर समस्या नाहीत, याकडे डॉ. हेगडे यांनी लक्ष वेधले आहे.
ओमिक्रॉनबद्दल आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात. गोव्यातील बहुसंख्य लोकांनी लसी घेतल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना मोठी समस्या भेडसावणार नाही. त्याचप्रमाणे तो मुख्यत्वे तरुणांना लक्ष्य करेल. पण तरुणांची प्रतिकारशक्ती चांगली असते आणि त्यामुळे ते ओमिक्रॉनचा प्रतिकार करतील. फक्त गरज आहे ती वृद्धांची काळजी घेण्याची. तरुणांनी तो वृद्धांपर्यंत पसरवू नये. त्यासाठी एक चांगला एन-95 मास्क वापरावा, गरज असल्यास दोन मास्क वापरावेत, सामाजिक अंतर राखावे आणि गर्दी टाळावी, असा सल्ला डॉ. हेगडे यांनी दिला आहे. लसीकरण आम्हाला ओमिक्रॉनविरुद्ध लढण्यासाठी मदत करेल. तसेच जेव्हा ओमिक्रॉनचा संसर्ग होईल तेव्हा ते खूप चांगली प्रतिकारशक्ती देईल, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.