सार्वजनिक परिवहनसेवेत मास्क सक्तीचा
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये दोन कोरोनाबाधितांमध्ये दक्षिण आफ्रिकन व्हेरियंट ओमिक्रॉन आढळून आल्यावर भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांदरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. सरकार फेस्क मास्क वापरण्याचा नियम पुन्हा कठोर करणार आहे. लोकांना आता सार्वजनिक परिवहन सेवेत आणि दुकानांमध्ये पुन्हा मास्क वापरावा लागणार असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे.
जॉन्सन यांनी देशात बाहेरून येणाऱया लोकांसाठी कोरोनाशी संबंधित प्रवेश नियम कठोर करण्याचीही घोषणा केली. विदेशातून येणाऱया प्रवाशांची आता ब्रिटनमध्ये आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. ही चाचणी देशात दाखल झाल्यावर दुसरा दिवस समाप्त होईपर्यंत कुठल्याही स्थितीत करवून घ्यावी लागणार आहे. चाचणी अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत प्रवाशाला क्वारंटाईन केले जाईल.
..तर 10 दिवसांचे क्वारंटाइन
ब्रिटनमध्ये पोहोचलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये ओमिक्रॉनची संशयास्पद लक्षणे आढळली असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनाही 10 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. नवा व्हेरियंट रोखण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलत आहोत. देशात कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याचा कार्यक्रम गतिमान केला जाणार असल्याचे पंतप्रधान जॉन्सन म्हणाले.
डेन्मार्कमध्ये 2 प्रवासी बाधित
दक्षिण आफ्रिकेत मिळालेला कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने जगात फैलावतोय. दक्षिण आफ्रिकेतून डेन्मार्कमध्ये परतलेल्या 2 प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे दिसून आली आहेत. आरटी-पीसीआर चाचणीत ते कोरानाबाधित असल्याची पुष्टी मिळाली आहे. या दोघांनाही आयसोलेट करण्यात आले असून फ्लाइटमधून प्रवास केलेल्या लोकांशी संपर्क साधला जातोय.
इस्रायलकडून प्रवासबंदी
इस्रायलने स्वतःच्या नागरिकांवर 50 आफ्रिकन देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे तेथील आरोग्य मंत्रालयाने सांगितले. इस्रायलने गुरुवारी 7 आफ्रिकन देशांना ‘रेड कंट्रीज’च्या शेणीत सामील केले होते. शनिवारी यात 43 देशांची भर पडली आहे.
कुवैतकडून विमानसेवा बंद
ओमिक्रॉनचा धोका पाहता कुवैतने 9 आफ्रिकन देशांमधून येणारी डायरेक्ट फ्लाइट्स रोखली आहेत. यात दक्षिण आफ्रिका, नामीबिया, बोत्सवाना, झिम्बाम्बे, मोझाम्बिक, लेसोथो, इस्वातिनी, झाम्बिया आणि मलावी सामील आहे. या देशांमधून येणाऱया कुवैती नागरिकांना 7 दिवसांपर्यंत क्वारंटाइन केले जाईल. तसेच त्यांची आरटी-पीसीआर चाचणी होणार आहे.
बांगलादेशचे उचलले पाऊल
बांगलादेशनेही दक्षिण आफ्रिकेसाठीच्या प्रवासावर बंदी घातली आहे. आम्ही स्क्रीनिंग वाढविले असून बंदर तसेच विमानतळांवर याचे कठोर पालन करण्याचा निर्देश दिल्याची माहिती आरोग्यमंत्री जाहिद मलिक यांनी दिली आहे.
नेपाळमध्ये 7 दिवसांचे क्वारंटाइन
नेपाळमध्येही दक्षिण आफ्रिकेतून येणाऱया प्रवाशांना 7 दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्याचा निर्देश देण्यात आला आहे. नेपाळ आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान कुठलीच थेट विमानसेवा नाही, पण अन्य आफ्रिकन देशांद्वारे दाखल झालेल्या प्रवाशांना एक आठवडाभर क्वारंटाइन व्हावे लागणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते कृष्णप्रसाद पौडेल यांनी सांगितले.
युरोपमध्येही कठोर धोरण
युरोपमध्येही या व्हेरियंटवरून कठोर धोरण अंमलात आणले जात आहे. ऑस्ट्रिया, चेक प्रजासत्ताक, जर्मनी, इटली आणि नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱया विमानोड्डाणांवर बंदी घातली. काही युरोपीय देशांनी बोत्सवाना, इस्वातिनी, लेसोथो, नामीबिया, झाम्बिया, झिम्बाम्बेसाठीची विमानसेवा रोखली आहे.