बॉलिवूड अभिनेत्री संजना सांघी स्वतःचा नवा चित्रपट ‘ओम – द बॅटल विदिन’वर स्वतःचे पूर्ण लक्ष केंद्रीत करू पाहत आहे. या चित्रपटातील माझी भूमिका यापूर्वीच्या माझ्या कामापेक्षा खूपच वेगळी आहे. या चित्रपटासाठी मला मानसिक तसेच शारीरिकदृष्टय़ाही तंदुरुस्त व्हावे लागले, असे ती सांगते.
‘रॉकस्टार’, ‘हिंदी मीडियम’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ यासारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका निभावल्यावर संजनाला ‘दिल बेचारा’त मुख्य नायिका म्हणून स्वतःचे अभिनय कौशल्य दाखवून देण्याची संधी मिळाली होती.
माझा नवा चित्रपट ऍक्शन-थ्रिलर पठडीतील आहे. याकरता मला प्रशिक्षण घ्यावे लागले कारण मला लटकून किक आणि पंच मारायचा होता. माझ्याकडे अनेक रंजक पटकथा आल्या आणि त्यांना नकार देणे माझ्यासाठी खूपच अवघड होते. पण आपल्याकडे केवळ मर्यादित वेळ आणि ऊर्जा असते. याचमुळे सर्वोत्तमाची निवड करावी लागते. या ऍक्शन चित्रपटानंतर मी काही चित्रपटांवर लक्ष केंद्रीत केले असून त्यांची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे तिने म्हटले आहे.