जांबोटी / वार्ताहर
भरधाव कॅन्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटून कॅन्टर पलटी झाल्याने क्लिनर जागीच ठार व चालक गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर शंकरपेठ चढतीनजीक घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की, जी ए-08-यू-7714 या क्रमांकाचा कॅन्टर आयशर राणेबेन्नूरहून नारळ घेऊन बिडी-खानापूर-जांबोटीमार्गे गोव्याकडे जात होता. मात्र, कॅन्टर भरधाव असल्यामुळे तसेच चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील शंकरपेठ चढतीनजीकच्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या बाजूच्या विद्युत खांबाला धडक देऊन पलटी झाला. रस्त्याशेजारी असलेल्या झाडात अडकल्यामुळे तो खोल दरीत कोसळण्यापासून बचावला. अपघातामध्ये क्लिनर जागीच ठार झाला. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. त्याचे नाव रिजवान अन्सारी (वय 19) असून सध्या त्याचे वास्तव्य राणेबेन्नूर येथे होते. गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव बाबुलाल कडेली (वय 49, रा. राणेबेन्नूर-कर्नाटक) असल्याचे समजते. या अपघतात विद्युतखांब मोडून कॅन्टरच्या दर्शनी बाजूचाही चक्काचूर झाला. समोरील दोन्ही टायर कॅन्टरपासून वेगळे झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. जांबोटीहून रुग्णवाहिका बोलावून जखमी कॅन्टर चालकाला खानापूर शासकीय दवाखान्यात दाखल केले.
शंकरपेठ चढतीनजीक रस्ता अरुंद व धोकादायक वळणाचा असल्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अपघात घडत असून येथे अनेकांचा बळी गेल्यामुळे जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.