नाबार्ड योजनेतून 22 लाखांचा निधी मंजूर
वार्ताहर / जांबोटी
ओलमणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या दोन खोल्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या खोल्यांच्या बांधकामासाठी नाबार्डमधून 22 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ओलमणी प्राथमिक शाळेच्या दोन खोल्या मोडकळीस आल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी सदर खोल्या पाडण्यात आल्या. मात्र शाळाखोल्या बांधकामासाठी निधी मंजूर होत नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या खोल्यांचे बांधकाम रेंगाळले होते. खोल्या बांधकामासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी एसडीएमसी कमिटीमार्फत आमदार अंजली निंबाळकर यांच्याकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन आमदार अंजली निंबाळकर यांनी ओलमणी प्राथमिक शाळेच्या दोन खोल्यांच्या बांधकामासाठी नाबार्ड योजनेंतर्गत 22 लाखांचा निधी मंजूर केला. सोमवारी आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते सदर शाळाखोल्यांचे भूमिपूजन करून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आल्यामुळे पालक व विद्यार्थीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष संतोष चिखलकर, उपाध्यक्ष मारुती पाटील, जांबोटी सीआरपी प्रमुख रमेश गावडे, मुख्याध्यापक पी. आर. गुरव, एसडीएमसी सदस्य डॉ. इनायतुल्ला सनदी, पिंटू नावलकर, पत्रकार हणमंत जगताप, परशराम चव्हाण, ज्ञानेश्वर देसाई, गोविंद मोहिते, एस. टी. मेलगे, व्ही. पी. नावगेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता भरमा गुडगेनट्टी, कंत्राटदार फिलीप आचारी यांच्यासह पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.