वृत्तसंस्था/ मुंबई
ओला इलेक्ट्रिक कंपनीने आपल्या पहिल्या वहिल्या ई-स्कूटरला 15 ऑगस्ट रोजी लाँच केले आहे. एस 1 आणि एस 1 प्रो या गाडय़ा कंपनीने बाजारात दाखल केल्या असून या दोन्हींची अनुक्रमे किंमत 99 हजार 999 रुपये, 1 लाख 29 हजार 999 रुपये इतकी असणार असल्याचे समजते.
दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र व राजस्थान राज्यात सवलतीनंतर या गाडीची किंमत कमी होणार असून विविध राज्यात किमतीत फरक असणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. गाडी लाँच केली असली तरी प्रत्यक्ष विक्रीला मात्र 8 सप्टेंबरपासून सुरूवात होणार असून डिलिव्हरी मात्र ऑक्टोबरमध्ये केली जाणार आहे. सदरची गाडी ग्राहकांना त्यांच्या वेबसाइटवर बुक करता येणार आहे.
कंपनीचे संस्थापक भावेश अग्रवाल यांनी स्कूटरचे लाँचिंग वेगळय़ा पद्धतीने केले. कृष्णगिरी येथील प्लांटच्या छतावरून पृथ्वीची सुंदरता दाखवून प्रदूषण पर्यावरणाचे कसे नुकसान करत आहे याची माहिती त्यांनी दिली. देशात दरवर्षी वाहनांमुळे 12 हजार कोटी लिटरचे इंधन खर्च होत असून देशाच्या एकूण प्रदूषणात 40 टक्के वाटा हा गाडय़ांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरची गाडी 3 सेकंदात 40 किमीचा वेग घेऊ शकणार असून सिंगल चार्जवर गाडी 181 किमीचे अंतर कापू शकणार आहे. नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर अशा मोडचा पर्याय गाडी चालवण्यासाठी गाडीत असणार आहे.
स्कूटरसोबत कंपनी 750 वॉटचा पोर्टेबल चार्जर देणार असून याअंतर्गत बॅटरी 6 तासात पूर्णपणे चार्ज होऊ शकणार आहे. ओलाच्या हायपर चार्जर स्टेशनवर 18 मिनिटात 50 टक्के बॅटरी चार्ज करू शकणार आहेत, असेही कंपनीने म्हटले आहे.