मेरशी भंगार अड्डय़ावरुन दोघांत हाणामारी : पोलीस मुख्यालयातून दोघांचेही निलंबन
प्रतिनिधी /पणजी
ओल्ड गोवा पोलीस स्थानकात डय़ुटीवर असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक ज्युलियो दिनीज व हवालदार समीर फडते यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पोलीस मुख्यालयातून या घटनेची गंभीर दखल घेतली असून या दोघां विरोधात गुन्हा नोंद करुन दोघांनाही निलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे काल रविवारी दिवसभर ओल्ड गोवा पोलिसांच्या या पराक्रमाचीच चर्चा सुरु होती.
ओल्ड गोवा पोलीस स्थानकातील हाणामारीची ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली होती. निलंबनाचा आदेश निघताच ही वार्ता गोवाभर पसरली.
मेरशी भंगार अड्डय़ाचे ‘कनेक्शन’
मेरशी येथील भंगार अड्डयावरून हे भांडण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मेरशी येथील भंगार अड्डयाचे मालक वासू नाईक याला हवालदार समीर फडते याने पोलीस स्थानकावर आणले. चौकशी करण्याच्या नावाखाली त्याला मारहाण करायला सुरुवात केली. हवालदार फडते हे मद्याच्या नशेत असल्याचा आरोप वासू नाईक याने केला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक ज्युलियो मध्ये आले नसते तर हवालदार समीर फडते यांनी आपल्याला जीवे मारले असते, असेही नाईक म्हणाले.
ज्युलियो, समीर यांच्यात मारहाण
वासू नाईक याला मारहाण होत असतानाच डय़ुटीवर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक ज्युलियो दिनीज यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि वासू नाईक याला मारहाण केल्याबाबत समीरला जाब विचारला. त्यामुळे हवालदार समीर फडते व सहाय्यक उपनिरीक्षक ज्युलियो यांच्यांत बाचाबाची वाढली आणि त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. सारा प्रकार घडल्यानंतर समीर फडते पोलीस स्थानकावरून निघून गेला. दुसऱया दिवशी म्हणजे रविवारी कारवाई करून दोन्ही पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंद करून दोघांनाही निलंबीत करण्यात आले आहे.
दरम्यान सहाय्यक उपनिरीक्षक ज्युलियो दिनीज यांची कन्या ऍड. रुझेल्ला दिनीज यांनी आपले वडील निर्दोष असल्याचे सांगितले. वास्तविक हवालदार समीर फडते यांनी मद्याच्या नशेत शनिवारी पोलीस स्थानकावर धिंगाणा घातला आणि आपल्या वडिलांना मारहाण केली. त्यामुळे समीर फडते यांच्यावर कारवाई होणे साहजिकच होते. मात्र ओल्ड गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिनेश गडेकर यांचे आणि समीर फडते यांचे साटेलोटे असल्याने दोषी असलेल्या समीर फडतेसह निर्दोष असलेल्या ज्युलियो दिनीज यांनाही निलंबीत केले हे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. समीर फडते यांनी शनिवारी रात्री मद्यापान करून धिंगाणा घातला होता. वास्तविक घटना घडली तेव्हांच समीर फडते याची मद्यपान केल्याची चाचणी व्हायला पाहिजे होते तसेही का केले नाही, असा प्रश्न उपस्थित करून ओल्ड गोवा पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांनाही संशयाच्या घेऱयात ओडले आहे.