नगरनियोजनमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
ग्रेटर पणजी पीडीएच्या अंतर्गत ओल्ड गोवा पंचायत क्षेत्रातील आणखी क्षेत्र आणण्याचा प्रस्ताव नगरनियोजन विभागाने रद्द केला असल्याची माहिती नगरनियोजनमंत्री तथा उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी एका पत्रकातून दिली आहे.
ओल्ड गोवा पंचायतीने ग्रेटर पणजी पीडीएच्या अंतर्गत पंचायत क्षेत्राचा आणखी काही भाग समाविष्ट करण्यासंदर्भात पाठविलेल्या प्रस्तावाचा नगरनियोजन विभागाने सविस्तर अभ्यास केला आहे. धार्मिक संस्थांनी व्यक्त केलेल्या भावनाही आपण विचारात घेतल्या आहेत. आपण मुख्यमंत्र्यांसमवेत या विषयावर चर्चा केली असून धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने कदंब नियोजन क्षेत्राच्या विस्ताराच्या प्रस्तावाला गाळणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार ग्रेटर पणजी पीडीएत आणखी क्षेत्र समाविष्ट करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असल्याचे कवळेकर यांनी स्पष्ट केले आहे.