आरटीओ सर्कल ते माणिकबागपर्यंत दर चढताच, निवासी मालमत्तांचा दर 3 हजार 960 प्रति चौ. फूट
गंगाधर पाटील / बेळगाव
वाहनांच्या खरेदीपासून दुरुस्तीपर्यंत आणि वाहन नोंदणीपासून परमीटपर्यंत सर्व प्रकारची कामे करणारा मार्ग अर्थात पी. बी. रोड. सीबीटी मार्गे आरटीओ सर्कलपर्यंत हा मार्ग जोडला गेलेला आहे. विविध कारणांनी या मार्गावरील आस्थापनांचे दर वाढत गेले. खरे तर हा जुना पी. बी. रोड. पुण्यावरून बेळगावला येऊन बेंगळूरला जोडणारा रस्ता, अशी त्याची ओळख. मात्र महामार्ग झाल्यानंतरही या जुन्या महामार्गाचे महत्त्व कधीच कमी झाले नाही, हे अधोरेखीत होते. या मार्गावरील आरटीओ सर्कल ते माणिकबागपर्यंतच्या टप्प्यात मिळकतींचे बाजारमूल्य चढतेच आहे. सध्या निवासी मालमत्तांचा दर 3 हजार 960 रुपये प्रति चौ. फूट तर व्यावसायिक मिळकतींचा दर 9 हजार 570 रुपये प्रति चौ. फूट झाला आहे.
वाहन खरेदी करायची असेल किंवा वाहनाची नोंद करायची असेल तर आरटीओ ते माणिकबाग रस्त्याची आठवण येतेच. वाहन दुरुस्तीसाठीदेखील या रस्त्याकडेच वळावे लागते. त्यामुळे आरटीओ सर्कल ते माणिकबाग मार्ग व्यवसायासाठी महत्त्वाचा मानला जातो. वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात येथील व्यावसायिक आस्थापने हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही जणांनी गांधीनगर, न्यू गांधीनगर, राष्ट्रीय महामार्ग याकडे हलविण्यात आले. तरीही आरटीओ सर्कल ते माणिकबाग रस्त्याचे महत्त्व टिकूनच आहे. यामुळेच सरकारी अहवालातही बाजारमूल्याच्यादृष्टीने हा मार्ग वरच्या क्रमांकालाच येतो.
आरटीओपासून माणिकबागकडे जाणाऱया रस्त्यावर वेगवेगळे व्यवसाय थाटलेले आहेत. हा रस्ता मध्यवर्ती बसस्थानकालाही जोडला गेला आहे. या रस्त्याला लागूनच भाजी मार्केट होते. त्याचे स्थलांतर एपीएमसी येथे करण्यात आले. असे असले तरी या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. ट्रक दुरुस्त करणारे, बॉडी बांधणारे, इतर दुरुस्ती करणारे मेकॅनिक दुकाने थाटून आहेत. ट्रक वाहतुकीचा व्यवसाय हा मोठी उलाढाल करणारा म्हणून ओळखला जातो. ट्रक दुरुस्ती असो किंवा इतर वाहनांची दुरुस्ती, त्यासाठी अधिक जागेची गरज असते. त्यामुळे व्यवसायासाठी मोठी जागा लागते. जुन्या काळातच अशा प्रकारे उपलब्ध जागा ज्यांनी ताब्यात घेतल्या ते व्यवसायाच्यादृष्टीनेही गब्बर झालेच. शिवाय आज त्यांच्या जागांची किंमतही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.
या परिसरात मोठय़ा प्रमाणात खुल्या जागा होत्या. मात्र विविध व्यवसायांसाठी अनेकांनी जागांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या रस्त्यावर विविध चार चाकी वाहनांची, दुचाकी वाहनांची शोरुमदेखील आहेत. या रस्त्याला लागूनच मध्यवर्ती बसस्थानक आहे. त्यामुळे हॉटेल्स, लॉजिंग्स, स्वीटमार्ट मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे जागेला अत्यंत महत्त्व आहे. मध्यवर्ती बसस्थानक असल्यामुळे परराज्यांतून तसेच ग्रामीण भागातून आलेले नागरिक मोठय़ा प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी करत असतात. त्यामुळे या रस्त्यावरील जागेला महत्त्व आहे. याचबरोबर फोर्ट रोडचे दरही मागील काही वर्षांच्या तुलनेत वाढले आहेत. निवासी दर 3 हजार रुपये प्रति चौ. फूट तर व्यावसायिक दर 4 हजार 200 रुपये प्रति चौ. फूट आहेत.
माणिकबागच्या पुढील भागात मात्र या मार्गावरील मालमत्तांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. पुढील भागात निवासी मालमत्तांचे दर 3 हजार 500 रुपये प्रति चौ. फूट असून व्यावसायिक मालमत्तांचा दर 5 हजार 60 इतका आहे. याच बरोबरीने हार्डवेअरची दुकाने आणि वाहनांच्या स्पेअर पार्ट्ससाठी प्रसिद्ध फोर्ट रोडवरील व्यावसायिक मालमत्तांचा दर 4 हजार 200 रुपये प्रति चौरस फूट झाला आहे. या ठिकाणी निवासी मालमत्ता शिल्लक नाहीत. मात्र एखाद्या परिस्थितीत आढळल्यास तिचे बाजारमूल्य प्रति चौ. फुटास 3 हजार रुपये ठरविण्यात आले आहे.
तुलनात्मकदृष्टीने विचार केल्यास चन्नम्मा चौकापासून कोर्ट कंपाऊंडमार्गे आरटीओ सर्कलपर्यंत जाणारा मार्गही मालमत्तांच्या दरांच्या बाबतीत ओल्ड पी. बी. रोडच्यादृष्टीने समांतरच आहे. तेथील व्यावसायिक मालमत्तांचा दर 5 हजार 544 प्रति चौ. फूट असून निवासी मालमत्तांचा दर 3 हजार 960 रुपये असा आहे. या ठिकाणी सध्यपरिस्थितीत नव्या मालमत्ता मिळविणे कठीण आहे. मात्र, उपलब्ध मालमत्ताधारकांनी आपली मालमत्ता विक्रीस काढल्यास दराची मर्यादा कोटय़वधींच्या घरात जाते.