केंद्रीय गृहमंत्र्यांचे आवाहन : गोळीबारप्रकरणी संसदेत निवेदन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना सुरक्षा व्यवस्था स्विकारण्याचा सल्ला दिला आहे. ओवैसी यांच्यावर उत्तर प्रदेशमधील गाझियाबादजवळ झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत माहिती दिली. तसेच ओवैसी यांनी सुरक्षा व्यवस्था घेण्यास नकार दिला आहे. आपण या सदनात ओवैसी यांना विनंती करतो की त्यांनी सुरक्षा व्यवस्था स्विकारून आमची चिंता मिटवावी, असे शाह म्हणाले.
3 फेब्रुवारीला ओवैसी यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा मुद्दा सोमवारी संसदेत उपस्थित करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हापूरमधील पिलखुआ भागात ओवैसी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सकाळी 11 वाजता, तर लोकसभेत दुपारी 4 वाजता स्पष्टीकरण दिले. हापूडमध्ये ओवैसी यांचा कोणताही कार्यक्रम नव्हता. तसेच ते कोणत्या मार्गाने जाणार होते याबाबतही प्रशासनाला माहिती नव्हती. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गाडीवर गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने दोघांना अटक करून तपास सुरू ठेवला आहे. तसेच फॉरेन्सिक पथक अधिक तपास करत असून पुरावे जमा करण्याचे काम सुरू असल्याचे शाह यांनी सांगितले.