प्रा.पौर्णिमा केरकर यांचे प्रतिपादन
वार्ताहर / मडकई
ओव्या म्हणजे मनापासून व्यक्त होणाऱया भावना आहेत. जात्यावरच्या ओव्या या पूर्वापार चालत आलेल्या असून त्यात प्रामुख्याने संसारातल्या वेदनांची व कर्तबगारीची जाण असते, असे प्रतिपादन लोककला अभ्यासक प्रा. पौर्णिमा केरकर यांनी केले. सम्राट क्लब मडकईतर्फे आयोजित केलेल्या ओवी गीतगायन स्पर्धेच्या बक्षिसवितरण सोहळय़ात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
वेगवान जीवनशैलीमुळे व मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाल्यामुळे ओवीसारख्या गीतांमधून मिळणारा आनंद आपण विसरत चाललो आहोत, असेही त्यांनी नमूद केले. व्यासपीठावर गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विद्या गावडे, सम्राट क्लब कपिलेश्वरीचे अध्यक्ष प्रशांत नाईक, मडकईचे अध्यक्ष सागर मुळवी हे उपस्थित होते.
डॉ. विद्या गावडे म्हणाल्या की, स्पर्धेतून आपल्याला ओवी गीत व धालो प्रत्यक्षात अनुभवण्याचा योग आला. प्रशांत नाईक यांनी सम्राट क्लबच्या कार्याची माहिती दिली. मडकई मतदारसंघ मर्यादित या ओवी गायन स्पर्धेत अंजली नाईक यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक रमिला रमाकांत नाईक तर तृतीय विठाबाई रोहिदास नाईक यांना मिळाले. चंद्रलेखा मडकईकर यांना चौथे व भाग्यश्री भोसले यांना पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
सम्राट क्लब मडकई आयोजित धालो उत्सव चित्रकरणात भाग घेतलेल्या पाच धालो संघटनांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यामध्ये श्री नवदुर्गा प्रासादिक धालो मंडळ महालवाडा मडकई, होंसेकर दहाजण समाज होंसोवाडा मडकई, वैरागी धालोत्सव मंडळ लाडेवाडा मडकई, लोखंडेश्वर दहाजण समाज आडण मडकई व दुतळे दहाजण समाज, दुतळे मडकई यांचा समावेश होता. वैष्णवी विष्णू नाईक व रेवती नंदा पालसरकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. स्वागत सागर मुळवी यांनी केले. सूत्रसंचालन सुशांत नाईक यांनी केले. दिनेश वळवईकर यांनी आभार मानले.