प्रतिनिधी/ बेळगाव
आत्महत्या करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अलंबले जातात. कोणी झाडाला गळफास घेतात तर आणखी कोणी घरातील तुळी, फॅनच्या हुक्कला गळफास घेऊन आपले जीवन संपवितात. गुरुवारपेठ टिळकवाडी येथील एका वृध्दाने रेल्वे ओव्हरब्रिजवरील ऍन्गलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
मनोहर लक्ष्मण भोसले (वय 65) असे त्याचे नाव आहे. रेल्वे ओव्हरब्रिजवरील ऍन्गलला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले आहे. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मानसिक अस्वस्थपणातून या वृध्दाने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच रेल्वे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नटराज, हवालदार शंकरानंद पुजेरी आदींनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तासाभरात मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. मनोहर यांची मानसिक स्थिती ठिक नव्हती. गेल्या एक वर्षांपासून त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मानसिक अस्वस्तपणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपूर्वी रेल्वे ओक्हरब्रिज खुला करण्यात आला होता. महात्मा बसवेश्वर उड्डाणपूर असे त्याचे नामकरणही करण्यात आले होते. या पूलाजवळ रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र पूलाच्या लोखंडी ऍंगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर हे पहाटे 4 वाजता आपल्या घरातून निघून गेले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते. सकाळी ओव्हरब्रिजवर आत्महत्येचा प्रकार घडल्याचे समजताच कुटुंबियांनी घटनास्थळी येवून मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह खाली उतरविला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी गर्दी जमली होती.