उत्पादन शुल्कची कारवाई : ओरोस भरारी पथकाची कामगिरी
प्रतिनिधी / ओरोस:
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने शुक्रवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे केलेल्या कारवाईत 1 लाख 80 हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त केली. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली असून याप्रकरणी सावंतवाडी-माठेवाडा येथील तेजस दिनेश गिरी (26) आणि सातार्डा येथील आत्माराम लक्ष्मण आरोंदेकर (27) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिळाली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक यु. एस. थोरात, जवान आर. डी. ठाकूर, दीपक वायदंडे, जे.आर.चव्हाण, एच.आर.वस्त, आर.एस.शिंदे आदींनी ही कारवाई केली.
मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार (एमएच-07/एस-4455) ही तपासणीसाठी थांबविण्यात आली. त्यामध्ये विविध प्रकारच्या दारुचे 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 46 बॉक्स आढळून आले. त्यामुळे 4 लाखाच्या कारसह 5 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जवान नि वाहनचालक जे. आर. चव्हाण यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक यु. एस. थोरात करत आहेत.