अधिकारी, ग्रामस्थांच्या बैठकीत आमदार नीतेश राणे यांच्या सूचना
प्रतिनिधी / कणकवली:
ओसरगाव येथे महापारेषणकडून उभारण्यात येत असलेल्या टॉवर व टॉवर लाईनसाठी ज्या लोकांच्या जमिनी जात आहेत, त्याबाबत झालेला सर्व्हे चुकीचा आहे. यात काहींची घरे, झाडे, जमिनी जात असूनही त्यांनी भरपाई दिलेली नाही. कंपनीकडून ग्रामस्थांना पोलीस बंदोबस्ताचा धाक दाखवून काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे चुकीचे असून टॉवरसाठीच्या जमिनीचा फेरसर्व्हे करा. प्रांताधिकारी, कंपनीचे अधिकारी व जमीनदारांची एकत्रित बैठक घेऊन योग्य नुकसान भरपाईबाबत कार्यवाही करा व नंतरच काम सुरू करा, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या.
ओसरगाव मळीवाडी परिसरात पारेषण कंपनीकडून टॉवरचे काम हाती घेण्यात आले आहे. या भागातील सुमारे 17 ते 18 लोकांच्या जमिनी, घरे, झाडे आदींपासून जवळून ही लाईन जात आहे. मात्र, हे काम सुरू करण्यापूर्वी केवळ सातजणांना भरपाई देण्यात आली. सुमारे 10 लोक अजूनही भरपाईपासून वंचित आहेत. त्यांना भरपाई न देता कंपनीकडून परस्पर काम सुरू करण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी भरपाई न मिळाल्यास काम न करण्याची भूमिका घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱयांकडे अपिल केल्यानंतर ग्रामस्थांनी टॉवरला विरोध नाही. मात्र, भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. यावेळच्या सुनावणीत फेरसर्व्हे करून भरपाई देण्यास सांगण्यात आले. तरीही कंपनीकडून ग्रामस्थांना आमच्याकडे परवानगी आहे, असे सांगून नोटिसा देत काम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते.
याबाबत ग्रामस्थांनी येथील प्रहार भवनमध्ये आमदार नीतेश राणे यांची भेट घेतली. यावेळी पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्राr, रवींद्र कावले उपस्थित होते. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, पारेषणचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील व ग्रामस्थांसोबत राणे यांनी चर्चा केली.
यावेळी करण्यात आलेला सर्व्हे चुकीचा असून तेथील काही लोकांची जमीन, झाडे, घरे जात असून त्याची भरपाई न देता काम सुरू करणे योग्य नाही. त्यासाठी सर्वप्रथम ग्रामस्थांच्या उपस्थितीत फेरसर्व्हे करून कोणती जागा जाते, हे निश्चित करा. ग्रामस्थांना भरपाई देण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकाऱयांच्या उपस्थितीत महापारेषण व ग्रामस्थांची बैठक लावून भरपाई देण्याबाबतची कार्यवाही करा व नंतरच काम सुरू करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना राणे यांनी दिल्या.