अमेरिकन ओपन टेनिस : अंतिम फेरीत अझारेन्कावर तीन सेट्समध्ये मात
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जपानच्या नाओमी ओसाकाने एका सेटची पिछाडी भरून काढत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काचा पराभव करून अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावत एकूण तिसरे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळविले.
चौथ्या मानांकित ओसाकाने बिगरमानांकित अझारेन्कावर 1-6, 6-3, 6-3 अशी सुमारे दोन तासांच्या खेळात मात केली. 22 वर्षीय ओसाकाने याआधी 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. 31 वर्षीय अझारेन्काने पहिला सेट केवळ 26 मिनिटांत संपवला. या सेटमध्ये ओसाकाकडून अपेक्षित खेळ झाला नाही. तिने तब्बल 13 चुका केल्या. दुसऱया सेटमध्येही अझारेन्काने 2-0 अशी आघाडी घेतली असताना ओसाकाने तिची सर्व्हिस ब्रेक करीत पकड मिळविली आणि 4-3 अशी आघाडीही घेतली. तिसऱयांदा सर्व्हिस बेक करीत ओसाकाने हा सेट जिंकून बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये चौथ्या गेममध्ये ओसाकाने पहिला ब्रेकथ्रू मिळवित 3-1 अशी आघाडी घेतली. यावेळी अझारेन्काने पुन्हा पकड मिळविण्याची संधी दवडताना तीन ब्रेकपॉईंट् वाया घालविले. 4-1 अशी आघाडी घेतल्यानंतर ओसाकाच्या दुसऱया चॅम्पियनशिप पॉईंटवर अझारेन्काने नेटमध्ये परतीचा फटका मारला आणि ओसाका या स्पर्धेची चॅम्पियन बनली.
ओसाका ही तीन ग्रँडस्लॅम जिंकणारी आशियातील पहिली टेनिसपटू आहे. याआधी चीनच्या लि ना हिने दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. अंतिम फेरीत पहिला सेट गमविल्यानंतरही जेतेपद पटकावणारी ओसाका ही यूएस ओपनची 1994 नंतरची पहिलीच खेळाडू आहे. 1994 मध्ये अरांत्झा सांचेझ व्हिकारिओने पिछाडीवर पडल्यानंतरही स्टेफी ग्राफचा पराभव करून या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. अझारेन्का तिसऱयांदा अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाली आहे.