ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस :नदाल, शॅपोव्हॅलोव्ह, व्हेरेव्ह, बेरेटिनी, सॅकेरी, अझारेन्का यांचेही विजय, गॉफ, म्लाडेनोविक पराभूत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
विद्यमान विजेती जपानची नाओमी ओसाका, ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी, मारिया सॅकेरी, एलिना स्विटोलिना, बेलिंडा बेन्सिक, व्हिक्टोरिया अझारेन्का, क्रेसिकोव्हा, वांग कियांग, राफेल नदाल, अलेक्झांडर व्हेरेव्ह, अल्काराझ, लॅजोविक, डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, मॅटेव बेरेटिनी यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गॉफला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.
2019 मध्ये स्पर्धा जिंकणाऱया 13 व्या मानांकित ओसाकाने कोलंबियाच्या कॅमिला ओसोरिओचा 6-3, 6-3 असा पराभव केला. ओसाकाचे आता ग्रँडस्लॅममधील पहिल्या फेरीचे रेकॉर्ड 19-2 असे झाले आहे. पाचव्या मानांकित मारिया सॅकेरीने दुसरी फेरी गाठताना जर्मनीच्या ताताना मारियाचा 6-4, 7-6 (7-2) असा पराभव केला. दुसऱया सेटमध्ये मारियाने कडवा प्रतिकार केल्याने ही लढत पावणेदोन तास चालली होती. तिची पुढील लढत चीनच्या झेंग किनवेगनशी होईल. 19 वर्षीय झेंगने बेलारुसच्या अलियाक्सांड्रा सॅस्नोविचवर 6-3, 1-6, 7-6 (7-5) अशी मात केली. युक्रेनच्या 15 व्या मानांकित एलिना स्विटोलिनाने दुसरी फेरी गाठताना फ्रान्सच्या फिओना फेरोचा 6-1, 7-6 (7-4) असा पराभव केला. ऑलिम्पिक चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकनेही विजयी सलामी देताना फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लाडेनोविकचा 6-4, 6-3 असा पराभव केला.
बार्टीचा एकतर्फी विजय
पहिल्या फेरीच्या अन्य सामन्यात अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्कोचा 6-0, 6-1 असा धुव्वा उडविला तर दोन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया 24 व्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने हंगेरीच्या पन्ना उदवार्डीचा 6-3, 6-1 असा पराभव केला. 2016 नंतर अझारेन्काने या स्पर्धेत मिळविलेला हा पहिला विजय आहे. बार्बोरा क्रेसिकोव्हाने आंद्रेया पेटकोव्हिकचा 6-2, 6-0 असा केवळ तासाभरात फडशा पाडला. गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेतही क्रेसिकोव्हाने तिला हरविले होते. माजी जागतिक 12 व्या मानांकित वांग कियांगने धक्कादायक निकाल देताना 18 व्या मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफचा 6-4, 6-2 असा पराभव केला. मागील वर्षी सलग दोन स्पर्धांत गॉफने कियांगला हरविले होते. प्रेंच ओपनमध्ये गॉफकडून दुसऱया फेरीत पराभूत झाल्यानंतर कियांगने फक्त ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.
जेबॉरची माघार
टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरने पाठदुखीमुळे पहिल्या फेरीआधी माघार घेतल्यामुळे तिच्या जागी रोमानियाच्या इरिना बेराला संधी देण्यात आली. मात्र स्पेनच्या नुरिया पेरिझस डायझने इरिनाचा 6-3, 6-1 असा पराभव करून ग्रँडस्लॅममधील पहिला विजय नोंदवला. अन्य एका सामन्यात कॅमिला जॉर्जीने ऍनास्तशिया पोटापोव्हाचा 6-4, 6-0 असा पराभव केला.
नदाल, शॅपोव्हॅलोव्ह, व्हेरेव्ह विजयी
पुरुष एकेरीत सहाव्या मानांकित स्पेनच्या राफेल नदालने मार्कोस गिरॉनचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. नदालने अमेरिकेच्या गिरॉनवर 6-1, 6-4, 6-2 असा सुमारे दोन तासाच्या खेळात विजय मिळविला. नदालचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील हा 70 वा विजय होता. दुसऱया फेरीत त्याची लढत जर्मनीचा यानिक हन्फमन किंवा ऑस्ट्रेलियाच्या थानासी कोकिनाकिस यापैकी एकाशी होईल. ग्रँडस्लॅममध्ये प्रथमच सीडिंग मिळालेल्या कार्लोस अल्काराझने चिलीच्या अलेजांद्रो टॅबिलोवर 6-2, 6-2, 6-3 अशी मात केली. त्याची पुढील लढत डुसान लॅजोविकशी होईल. लॅजोविकने पहिल्या सामन्यात मार्टन फुक्सोविक्सवर 6-3, 4-6, 6-1, 6-7 (6-8), 6-1 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हलाही विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने क्रोएशियाच्या लॅजलो डेअरवर 7-6 (7-3), 6-4, 3-6, 7-6 (7-3) अशी मात केली. डेअरला पहिल्या व चौथ्या सेटवेळी आपल्या सर्व्हिसवर सेट जिंकण्याची संधी होती. पण दोन्ही वेळेस शॅपोव्हॅलोव्हने त्याची संधी हिरावून घेतली. अन्य एका सामन्यात सातव्या मानांकित इटलीच्या मॅटेव बेरेटिनीने अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमावर 4-6, 6-2, 7-6 (7-5), 6-3 अशी मात केली. सुमारे सव्वातीन तास ही लढत रंगली होती. जर्मनीच्या तिसऱया मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने आपल्याच देशाच्या डॅनियल अल्टमायरवर 7-6 (7-3), 6-1, 7-6 (7-1) अशी मात करून दुसरी फेरी गाठली. त्याची पुढील लढत ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनशी होणार आहे. मिलमनने स्पेनच्या फेलिसियानो लोपेझचा चार सेट्समध्ये पराभव केला.