बार्टी, अझारेन्का, ऍनिसिमोव्हा, पेसिकोव्हा, व्हेरेव्ह, बेरेटिनी, शॅपोव्हॅलोव्ह, मोनफिल्स, नदाल चौथ्या फेरीत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
अमेरिकेच्या अमांदा ऍनिसिमोव्हाने धक्कादायक निकाल देताना जपानच्या विद्यमान विजेत्या नाओमी ओसाकाला स्पर्धेबाहेर घालवित ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळविले. याशिवाय अग्रमानांकित ऍश्ले बार्टी, व्हिक्टोरिया अझारेन्का, बार्बोरा क्रेसिकोव्हा, मारिया सॅकेरी, जेसिका पेगुला, पॉला बेडोसा यांनीही चौथी फेरी गाठली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर व्हेरेव्ह, डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, मॅटेव बेरेटिनी, गेल मोनफिल्स, राफेल नदाल यांनी चौथ्या फेरीत स्थान मिळविले तर एलिना स्विटोलिना, कार्लोस अल्काराझ, एलेना ओस्टापेन्को यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले.
अमेरिकेच्या ऍनिसिमोव्हाने एका सेटची पिछाडी भरून काढत जपानच्या 13 व्या मानांकित ओसाकाचा 4-6, 6-3, 7-6 (10-5) असा पराभव केला. सव्वादोन तास ही लढत रंगली होती. तिची पुढील लढत ऍश्ले बार्टीशी होईल. बार्टीने कॅमिला जॉर्जीचा 6-2, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. बार्टीने आतापर्यंतच्या तीन सामन्यात फक्त 8 गेम्स गमविले आहेत. 24 व्या मानांकित अझारेन्काने 15 व्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाचा 6-0, 6-2 असा धुव्वा उडविला. तिची पुढील लढत प्रेंच ओपन चॅम्पियन पेसिकोव्हाशी होईल. क्रेसिकोव्हाने एका सेटची पिछाडी भरून काढत 26 व्या मानांकित एलेना ओस्टापेन्कोवर 2-6, 6-4, 6-4 अशी मात केली. अन्य सामन्यात पाचव्या मानांकित मारिया सॅकेरीने व्हेरोनिका कुडरमेटोव्हाचा 6-4, 6-1, जेसिका पेगुलाने नुरिया पेरिझसचा 7-6 (7-3), 6-2, आठव्या मानांकित पॉला बेडेसाने मार्टा कोस्टय़ुकचा 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली.
व्हेरेव्ह, शॅपोव्हॅलोव्ह विजयी
पुरुष एकेरीत व्हेरेव्हने पात्रता फेरीतून आलेल्या रॅडू अल्बॉटवर 6-3, 6-4, 6-4 अशी मात केली. शॅपोव्हॅलोव्हविरुद्ध त्याची पुढील लढत होईल. तिसऱया मानांकित व्हेरेव्हने या सामन्यात 16 बिनतोड सर्व्हिस केल्या. चौदाव्या मानांकित शॅपोव्हॅलोव्हने चौथी फेरी गाठताना अमेरिकेच्या रीली ओपेल्कावर 7-6 (7-4), 4-6, 6-3, 6-4 अशी मात केली. विम्बल्डनची अंतिम फेरी गाठलेल्या इटलीच्या बेरेटिनीने स्पेनच्या 18 वर्षीय कार्लोस अल्काराझवर 6-2, 7-6 (7-3), 4-6, 2-6, 7-6 (10-5) असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. चार तास दहा मिनिटे ही लढत रंगली होती. फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने चौथी फेरी गाठताना चिलीच्या क्रिस्टियन गॅरिनचा 7-6 (7-4), 6-1, 6-3 असा पराभव केला. स्पेनच्या नदालने कॅरेन खचानोव्हचा 6-3, 6-2, 3-6, 6-1 असा पराभव करून चौथी फेरी गाठली.