डोहा/ वृत्तसंस्था
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या कतार खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत लॅटव्हियाच्या एलेना ओस्टापेंकोने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना स्पेनच्या मुगुरुझाचा पराभव केला.
गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ओस्टापेंकोने मुगुरुझावर 6-2, 6-2 अशी मात करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. अलिकडच्या कालावधीतील ओस्टापेंकोचा सलग नववा विजय आहे. 2016 साली या स्पर्धेत तिने उपविजेतेपद तर गेल्या आठवडय़ात तिने दुबईतील टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. दुसऱया एका सामन्यात पोलंडच्या स्वायटेकने साबालेन्काचा 6-2, 6-3, ग्रीकच्या सॅकेरीने कोको गॉफचा 6-3, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.