वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्यक्तींचा रक्तगट आणि कोरोनाचा संसर्ग यांचा जवळचा संबंध असल्याचे एका संशोधनात दिसून आले आहे. ज्या व्यक्तींचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असतो त्याना इतर रक्तगटांच्या व्यक्तींच्या तुलनेत कोरोना संसर्गाचा धोका कमी प्रमाणात असतो असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
‘ब्लड ऍडव्हान्सेस’ नामक शास्त्रीय नियतकालिकात या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार ओ पॉझिटिव्ह रक्तगट कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी अधिक सुरक्षित आहे. साधारणतः 4 लाख 73 हजार व्यक्तींच्या तपासणीतून ही महत्वपूर्ण बाब समोर आली आहे.
कोणता रक्तगट अधिक असुरक्षित?
ज्यांचा रक्तगट ए किंवा एबी या प्रकारांमध्ये मोडतो त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. त्या या प्रकारातील रक्तगटाच्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी करताना रक्तगटाची चाचणी करणेही महत्वाचे ठरणार आहे. प्रत्येकाने रक्तगटाची चाचणी आधीच केल्यास कोरोनाविषयी कोणती आणि किती दक्षता बाळगावी लागेल, याचे अनुमान आधी करता येणे शक्य आहे.
मात्र सावधगिरी हवीच
कोरोना होण्यास रक्तगट हा एकच घटक उत्तरदायी नाही. तर वय, इतर विकार, एकंदर रोगप्रतिकारशक्ती, राहणीमान हे इतर घटकही तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे रक्तगट कोणताही असला तरी प्रत्येकाने दक्षता बाळगणे आणि नियमांचे पालन करणे अत्यावश्यकच आहे, असेही अहवालात म्हटले आहे.